
नांदेड| अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी मुक्रमाबाद पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत २२ लाख ४२ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.


पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार २० मार्च रोजी सायंकाळी लखमापूर फाटा परिसरात रोडलगत झाडाझुडपांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत आरोपींना रंगेहाथ पकडले.

या कारवाईत तीन चारचाकी वाहने, एक दुचाकी, चार मोबाईल, जुगार साहित्य तसेच रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.


ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुक्रमाबाद पोलिसांच्या पथकाने केली असून, आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध जुगार व्यवसायाविरोधात पोलिसांचा हा मोठा धक्का मानला जात असून, पुढील कारवाई सुरू आहे.




