नांदेड l मरळक येथील प्रसिद्ध विमलेश्वर महादेव मंदिरात आज सकाळी दर्शनासाठी गेलेल्या महारुद्र स्वामी या भाविकावर सुमारे २५ ते ३० वानरांनी अचानक हल्ला चढविला, या हल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महारुद्र स्वामी हे रोजप्रमाणे मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिर परिसरातील झाडांवर मोठ्या संख्येने वानरांचे वास्तव्य असून, भाविकांना वारंवार त्रास दिल्याच्या तक्रारी पूर्वीपासूनच येत होत्या. त्याचवेळी मंदिराच्या गेटजवळ बसलेल्या वानरांच्या टोळीने एका महिलेस त्रास देत असल्याचे दिसताच महारुद्र स्वामी यांनी मदतीसाठी पुढे पाऊल टाकले. परंतु अचानक वानरांची टोळी स्वामींवर झेपावली आणि त्यांना जमिनीवर पाडून गंभीर जखमी केले.



गावातील नागरिकांनी आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी काठ्या घेऊन वानरांना हुसकावून लावले आणि महारुद्र स्वामींचा जीव वाचवला. मात्र, त्यांच्या शरीरावर खोलवर जखमा झाल्या असून, तातडीने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार,मंदिरात नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते आणि या काळात वानरांच्या हल्ल्यांच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेक महिलांवर, लहान मुलांवर आणि शेतात काम करणाऱ्या मजुरांवरही हे वानर हल्ला करत असल्याचे सांगण्यात आले. आठवडी बाजारातील भाजीपाला व फळ विक्रेत्यांनाही या टोळीने वारंवार त्रास दिला आहे.

स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे या वानरांचा बंदोबस्त करण्याची तातडीची मागणी केली आहे. काही वर्षांपूर्वी याच गावात वानरांच्या हल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली असून, ग्रामस्थांमध्ये आता प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावकऱ्यांची मागणी
> “वानरांचा बंदोबस्त न झाल्यास आम्हाला आणि आमच्या लेकरांना घराबाहेर पडणेही कठीण होईल. वनविभागाने त्वरीत कारवाई करावी.”


