नांदेड l गेल्या आठवड्यात नांदेड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरे, झोपड्यांमध्ये तसेच सखल भागांत पाणी शिरले होते. त्यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभुमीवर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके मार्फत विविध उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


नदीचा पुर ओसरल्यानंतर पुरग्रस्त भागांना *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पालिकेमार्फत करावयाच्या विविध उपाययोजने संदर्भात निर्देशीत केले आहे. त्यात प्रामुख्याने नांदेड शहरातील महानगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी औषध फवारणी, स्वच्छता, कीटकनाशकांची फवारणी, पाण्याचे नमुने तपासणे आदी कामे हाती घेऊन ज्या भागांत पाणी भरले होते अशा भागांतील घरांमध्ये जाऊन, चौकशी करून, आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याबाबत मनपा आयुक्तांनी यावेळी आदेशीत केले आहे. महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रावर पाणी शुध्दीकरणासाठी वापरली जाणारी विविध रसायणे मुबलक प्रमाणात ठेवण्यात यावीत तसेच साथीचे रोग पसरू नये यासाठी पाण्याचे नमुने तपासून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी असे आदेश यावेळी मनपा आयुक्तांनी दिले आहेत.



गोदावरी नदी मागील ८ दिवसांपासुन पुराच्या पाण्यामुळे दुथडी भरुन वाहत होती. नदीचे पाणी काल रात्री १.०० वाजल्यापासुन ओसारायला सुरुवात झालेली आहे. विष्णुपुरी धरणाचे १७ पैकी १४ गेट बंद करण्यात आलेले असुन सध्या ०३ गेटमधुन जवळपास ११,७९५ क्यूसेक्सचा प्रवाह नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पुराचे पाण्यामुळे बहुतांश नाल्यांमध्ये फुगवटा निर्माण होऊन नदीपात्रा लगतच्या वस्त्यांमध्ये व घरांमध्ये शिरले होते. सध्या नदीच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याने घरांमध्ये शिरलेले पाणी ओसरुन नाल्याकाठी असलेल्या रस्त्यांवर गाळ साचलेला आहे. या सर्व भागांची तसेच पूरग्रस्त नागरीकांच्या घरामधील चिखल व गाळाची साफसफाई केल्यानंतरच नागरीक निवारा केंद्र सोडतील अशी खबरदारी घेण्याचे मनपा आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.


मनपा आयुक्तांनी पुरग्रस्त भागांची पाहणी करतांना प्रामुख्याने नावघाट पुल, गोवर्धन घाट व वसरणी घाटास भेट दिली. नावघाट पुलावरील पालिकेची पाणी पुरवठा रायजिंग मेन लाईन पुराच्या पाण्यामुळे क्षतिग्रस्त झाली होती. सदरील जलवाहीणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असुन सदरील कामाची आयुक्तांनी जातीने जाऊन पाहणी केली. नावघाट पुलावरील ०६ पाईप पुराच्या पाण्यामुळे वाहुन गेले होते. त्यामुळे नविन पाईप मागवुन फिटींग करण्यात येत असुन ०३ नविन कॉंक्रिट ब्लॉक सुध्दा दुरुस्ती करण्यात येत आहेत.येत्या २४ तासात सदरील जलवाहणीचे टेस्टींग करुन जलवाहिनी चालु करण्यात येणार आहे. सदरील काम तातडीने पूर्ण करुन दक्षिण नांदेडचा पाणी पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करावा तसेच दुरुस्तीच्या कालावधीत संबंधीत भागांना टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याचे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले आहेत.

त्याचप्रमाणे गोवर्धनघाट स्मशानभुमी पुराच्या पाण्यामुळे मागील १५ दिवसांपासून पाण्याखाली गेली होती. सदरील ठिकाणी पालिकेच्या स्वच्छता विभागा मार्फत होत असलेल्या साफसफाईच्या कामाची आयुक्तांनी पाहणी करुन तातडीने परिसर व घाट स्वच्छ करून नागरीकांना अंतिमसंस्कारासाठी स्मशानभूमी तात्काळ उपलब्ध करुन देण्याची सुचना यावेळी आयुक्तांनी केली आहे. तसेच वसरणी घाटावर सुध्दा मनपा आयुक्तांनी भेट देऊन त्या ठिकाणी होत असलेल्या स्वच्छता विषयक कामकाजाचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे पुरग्रस्त भागांना भेटी देताना आयुक्तांनी देवी विसर्जन व्यवस्थेची सुध्दा पाहणी केली.
शहरातील पुरग्रस्त नागरीकांनी निवारा केंद्र सोडण्याची घाई न करता आपले घर व आपल्या परिसराची पूर्ण स्वच्छता व इतर आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतरच निवारा केंद्र सोडावे तसेच पूरग्रस्त नागरीकांनी आवश्यक असलेली सर्व ती मदत करण्यास महापालिका प्रशासन तत्पर असुन नागरीकांनी त्यांच्या अडचणीसाठी महापालिका प्रशासनास संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी मनपा आयुक्तांनी केले आहे.


