नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाच्यावतीने सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अभिलेखे व्यवस्थित ठेवण्यात यावेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनियमितपणा असणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना खर्च निरीक्षक ऐ. गोविंदराज यांनी दिल्या.
देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाची उमेदवारांच्या खर्चाबाबतची आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात खर्च निरीक्षक ऐ. गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी संपर्क अधिकारी श्रीनिवास गंगथडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, भरारी पथक समन्वयक तथा देगलूर पंचायत समिती गटविकास अधिकारी शेखर देशमुख, बिलोली गटविकास अधिकारी श्रीनिवास पदमवार, सहाय्यक खर्च निरीक्षक माळी, एस. एस. रामोड, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आशिष महेंद्रकर, उपनिरीक्षक संदीप देशमुख, मिडिया कक्ष साहाय्यक श्रीमती सुषमा मोहोड, विठ्ठल चंदनकर, नरहरी कोलगाणे, प्रा. महेश कुलकर्णी, विजय शिकारे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खर्च निरीक्षकांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. उमेदवारांच्या खर्चाबाबत तयार करण्यात आलेल्या सर्व अभिलेखांची पाहणी केली तसेच या अभिलेखासंबंधी विभाग प्रमुखांना अधिकची माहिती दिली. सर्व उमेदवारांना त्यांच्या दैनंदिन खर्चाबाबत सूचना देण्यात आले असल्या तरीही त्यांच्याकडून खर्चाचा तपशील योग्य पद्धतीने प्राप्त होणे अपेक्षित असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.