नांदेड| जिल्ह्यातील भाग्यनगरातील संगमेश्वर मंदिर व लहुजी नगर, बारड येथील घरफोडी प्रकरणातील दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून ₹32,000 रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीं मध्ये सुरज रामकिशन घेणे (वय 24, रा. लक्ष्मीनगर, मालटेकडी रोड, नांदेड, ह.मु. नागाराम झोपडपट्टी, निजामाबाद), अक्षय उर्फ भोप्या सुरेश कांबळे (वय 23, रा. आंबेडकर नगर, जनता कॉलनी, नांदेड) यांचा समावेश असून, आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी अंदाजे दोन महिन्यांपूर्वी संगमेश्वर मंदिर व बारड येथील घरफोडीतून चोरी केली होती.


ही कारवाई अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि उदय खंडेराय यांच्या नेतृत्वात पोउपनि नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाने केली. आरोपींना मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी भाग्यनगर पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.




