लातूर/नांदेड| राज्यात व देशात लिंगायत समाजाची मोठी ताकद आहे.समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे.हा संपूर्ण समाज एकत्र आल्याशिवाय प्रगती होणे शक्य नाही,असे प्रतिपादन राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी केले.
खा.अजित गोपछडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचा गुरुवारी( दि.५)भक्तीस्थळ राजूर येथे शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिवादन करून शुभारंभ झाला*.या सन्मान यात्रेचा २१ सप्टेंबर रोजी श्रीक्षेत्र मंगळवेढा येथे समारोप होणार आहे.
समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी ही सन्मान यात्रा आयोजित केली असल्याचे खा. अजित गोपछडे यांनी यावेळी सांगितले.वीरशैव लिंगायत समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या जवळपास दीड कोटी असून या समाजाला राजकीय क्षेत्रात वाटा मिळाला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मी भारतीय जनता पक्षाचे चाळीस वर्षापासून इमानदारीने काम करतो. मी केवळ लिंगायत समाजाचा आहे म्हणून आणि शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या आशीर्वादानेच खासदार होऊ शकलो. ज्ञानाची, भक्तीची ही भूमी असून लिंगायत समाज प्रामाणिक आहे, हिंदुत्ववादी आहे. सेवाभावी आणि हा समाज शोषिक देखील असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले,या सन्मान यात्रेचे आयोजन वीरशैव लिंगायत समाज एकत्र करण्यासाठी आहे.
आपल्या समाजावर भारतीय जनता पार्टीतील वरिष्ठ नेत्यांचे विशेष लक्ष आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ दिले.या महामंडळाला ५० कोटींचा निधीही त्यांनी उपलब्ध करून दिला.तो निधी तोकडा असून येणाऱ्या काळात बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला १ हजार कोटी रुपयांचा निधी मी राज्य शासनाकडे मागणार आहे.वीरशैव लिंगायत समाजाने एक झाल्यास ओबीसी प्रवर्गातून आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही,असे त्यांनी सांगितले.
भविष्यात लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून देण्यासाठीही मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जवळपास ४७ विधानसभा मतदारसंघांमध्ये वीरशैव लिंगायत समाजाची संख्या मोठी आहे.कुठे पहिला, कुठे दुसरा तर कुठे समाज तिसऱ्या क्रमांकावर आहे.लिंगायत समाजाला विचारल्याशिवाय या मतदारसंघात पानही हलू शकत नाही.राज्यात ५० ते ६० आमदार निवडून आणण्याची ताकद लिंगायत समाजात आहे. *शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधी स्थळाला आज ३१ लाखांचा निधी देत असून हा निधी प्रतिकात्मक आहे.येणाऱ्या काळात राज्य शासनाकडून २५ कोटी रुपये निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी वीरशैव लिंगायत समाजाचा फक्त राजकीय स्वार्थासाठी आजपर्यंत उपयोग करण्यात आला अशी खंत व्यक्त केली.शिवलिंग शिवाचार्य महाराजांना भारतरत्न देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.सध्या भक्ती स्थळाला ‘ब’ दर्जा असून ‘अ’ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
या सन्मान यात्रेचा शुभारंभ झाल्यानंतर राजुर येथील शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, शिरूर ताजबंद, चापोली व चाकूर येथे जंगी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात त बोलताना बालाजी पाटील यांनी लिंगायत समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य गुरुराज महाराज यांची होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार मजगे यांनी केले.दरम्यान सन्मान यात्रेला समाजातील मान्यवरांसह, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.