मुंबई /नांदेड| ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या नेत्यांवर मराठा समाजातील गुंड प्रवृत्तींकडून होत असलेले हल्ले आता असह्य झाले आहेत! प्रा. लक्ष्मण हाके, मा. नवनाथ आबा वाघमारे आणि कार्यकर्ते पवन करवर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांचा ओबीसी भटके विमुक्त महासंघ व वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.


२३ सप्टेंबर रोजी वाघमारे यांच्या घरासमोर उभी असलेली स्कार्पिओ गाडी पेटवली गेली, तर २७ सप्टेंबर रोजी प्रा. हाके यांच्यावर दहा-बारा गुंडांनी हल्ला करून गाडीची तोडफोड केली. या आधीही बीड जिल्ह्यातील गेवराई येथे हाके यांच्यावर हल्ला झाला होता. परभणी येथे कार्यकर्ते करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा हात-पाय फ्रॅक्चर झाला आहे.


ओबीसी भटके विमुक्त महासंघ व वंचित बहुजन आघाडी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. या हल्ल्यांच्या मागे मराठा समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती कार्यरत असून, ओबीसींचा आवाज दाबण्याचा हा कट असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


वंचित बहुजन आघाडीचे स्पष्ट विधान: “ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांवर होत असलेले हल्ले तात्काळ थांबवावेत! हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून ओबीसी नेत्यांना पोलीस संरक्षण द्यावे. अन्यथा ओबीसी भटके विमुक्त महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन छेडेल!”

ओबीसी समाजावरील प्रत्येक हल्ल्याला संविधानावरचा हल्ला मानण्यात येईल आणि सरकारची मौन वृत्ती ही गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप आघाडीने केला आहे. ओबीसी समाजाला पूर्ण संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारने तत्काळ पार पाडावी, अन्यथा होणाऱ्या सामाजिक असंतोषास फडणवीस सरकार जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.


