तिथीनुसार १२ फेब्रुवारी आणि इंग्रजी तारखेनुसार १५ फेब्रुवारी रोजी देश विदेशात गुरु रविदास जयंती साजरी होत असून त्या संबंधाने हा वैचारिक लेख..!


सामाजिक क्रांतीचे अग्रदूत गुरु रविदास यांची जयंती सध्या सर्वत्र साजरी होऊ लागली आहे. यात चर्मकार समाज प्रामुख्याने भाग घेत आहे. ही आनंदाची बाब आहे, पण हा आनंद पूर्ण नाही तर अपूर्ण आनंद आहे. जेंव्हा संपूर्ण बहुजन समाज गुरु रविदासांची जयंती मनापासून साजरी करु लागेल तेंव्हाच हा आनंद पूर्ण आनंद होऊ शकेल. कारण गुरु रविदासांनी केवळ आपल्याच एका जातीसाठी नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी काम केले आहे.


कोणीच साजरी करीत नसेल तर चर्मकार समाज आपले आद्य कर्तव्य म्हणून गुरु रविदासांची जयंती साजरी करु लागला. ज्या जातीत आपला जन्म झाला त्या जातीतील महामानवांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करणे यात कांहीही चुकीचे नाही. सुरुवातीस महार म्हणजे बौद्ध समाज परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत होता. आता त्यास व्यापक स्वरूप आले आहे. जसाजसा काळ पुढे सरकत जाईल तसतसे महामानवांची व्यापकता समाजाच्या लक्षात येत जाईल. आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कुणा एका जातीची मालमत्ता नाही तर एक विश्व वंदनीय व्यक्तीमत्व झाले आहे. जातीयवादी लोक जितका विरोध करतील तितकी महामानवांची वैचारिक व्यापकता वाढत जात असते.


जातीचे लोक जातीतील महामानवांची जयंती साजरी करतात, याचा त्या जातीला दोष देता येणार नाही. यासाठी जबाबदार असते ती आपल्याच देशातील जातीयवादी समाज व्यवस्था. महामानवांची जातनिहाय विभागणी करुन प्रत्येक महामानवाला त्यांच्या जातीपुरते मर्यादित ठेवण्याचे षडयंत्र मनुवादी व्यवस्थेने रचलेले आहे. या षडयंत्राचे आपण शिकार आहोत.
भारतातील जातीव्यवस्थेला आव्हान देण्याचे काम गुरु रविदासांनी केले. आता त्यांच्या पश्चात आपण काय करायचे ? ज्यांना रविदास समजला त्यांनी काय करायचे ? रविदासांनी जे काम केले तेच करायचे की त्याच्या अगदी उलटे करायचे ? आम्ही सध्या काय करीत आहोत ?

गुरु रविदासांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात काम केले होते, आम्ही जाती व्यवस्था बळकट करण्याचे काम करीत आहोत. आमचे सरळ विधान असते की चर्मकार समाजाचे कुलदैवत गुरु रविदास ! रविदास हे चर्मकार जातीतील असले तरी ते केवळ चर्मकार जातीचे कुलदैवत नाहीत तर संपूर्ण बहुजन समाजाचे महामानव आहेत. देव, दैवत किंवा देवाचा अवतार नसून एक क्रांतिकारक महामानव आहेत. गुरु रविदासांना मंदिरात बंदिस्त करण्याची सध्या चढाओढ लागली आहे. तेथे आरती भजन कीर्तन आदी हिंदू धर्माचे कार्यक्रम जोरात संपन्न होत आहेत. रविदासांच्या मूर्तीपुढे गणपतीची आणि तमाम हिंदू देवी देवतांच्या आरत्या म्हटल्या जात आहेत. यामुळे रविदासांना अपेक्षित कार्य होत आहे काय याचा सुज्ञ लोकांनी विचार केला पाहिजे.
रविदास जयंती साजरी करणे म्हणजेच जाती व्यवस्थेच्या विरोधातील लढाई तीव्र करणे, अज्ञान अंधश्रद्धा रुढी परंपरेच्या विरोधात संघर्ष करणे, विज्ञानवादी व संविधानवादी विचारांचा प्रसार करणे हे होय ! अशी जयंती जे साजरी करीत नाहीत ते फक्त रविदास जयंतीचा निव्वळ देखावा करीत आहेत असे समजावे लागेल ! समाजाचा भरमसाठ पैसा गोळा करायचा आणि स्वतःसाठी, स्वतःच्या मोठेपणासाठी, स्वतःचे मोठमोठे फोटो असलेले कटाऊट आणि बॅनर्स लावण्यासाठी , स्वतःच्या संघटनेच्या प्रसिद्धीसाठी, संघटनेचे झेंडे नाचविण्यासाठी कुणी करीत असतील तर अशा चतुर लोकांपासून समाजाने सावध राहिले पाहिजे.
कांही जण जयंती म्हणजे फक्त शोभायात्रा काढून लोकांना भावनिक आवाहन करुन शोभायात्रेत सहभागी करुन घेतात व त्यातून फक्त स्वतःचे शक्ती प्रदर्शन करुन घेतात. पुढाऱ्यांना बोलावून हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की हा सारा समाज माझ्या पाठीशी आहे. लोक रविदासांसाठी व सामाजिक ऐक्यासाठी शोभायात्रेत किंवा जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी होत असतात आणि कांही चतूर कार्यकर्ते या लोकभावनेचा बाजार मांडत असतात. वैचारिक प्रबोधन, सभा, व्याख्यान, जनजागरण म्हटले की कांही लोकांच्या अंगावर काटा येत असतो. मिरवणूक काढून दाळभात खाऊ घालणे यालाच ते जयंती कार्यक्रम असे आजवर समजत आले आहेत. रविदास जयंती म्हणजे वैचारिक परिवर्तन व त्यातून सामाजिक परिवर्तन हे समीकरण रुढ झाले पाहिजे..!
लेखक,,,इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, संस्थापक, अ. भा. गुरु रविदास समता परिषद, मो. ८५५ ४९९ ५३ २०


