नांदेड, अनिल मादसवार| माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक, प्रशासकीय व सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे वर्ष २०२६ चा मानाचा “नांदेड भूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.


रविवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी नांदेड येथील कै. चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान येथे आयोजित दोन दिवसीय “नरेंद्र–देवेंद्र महोत्सव” या काव्य मैफिलीत हजारो रसिकांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी व संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली.

अशोकराव चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिलेल्या संमतीमुळे “नांदेड भूषण” पुरस्काराच्या प्रतिष्ठेत अधिक भर पडली आहे. विशेष म्हणजे, या पुरस्काराचा पहिला मान ज्येष्ठ पत्रकार सुधाकराव डोईफोडे यांना प्रदान करण्यात आला होता. सन २००० साली दुसऱ्या पुरस्कारासाठी अशोकराव चव्हाण यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती; मात्र त्या वेळी विचारधारा वेगळी असल्याने त्यांनी नम्रपणे नकार दिला होता. यंदा संयोजकांच्या विशेष आग्रहामुळे त्यांनी पुरस्कार स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने हा क्षण ऐतिहासिक ठरत आहे.


अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा “नांदेड भूषण पुरस्कार” रोख रक्कम ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र व महावस्त्र अशा स्वरूपाचा आहे. अशोकराव चव्हाण यांचा राजकीय प्रवास व्यापक व प्रभावी राहिला आहे. त्यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले आहे. चार वेळा आमदार, दोन वेळा लोकसभेचे खासदार, विधानपरिषदेचे सदस्य तसेच सध्या राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

सन १९८५ मध्ये संजय गांधी निराधार योजना, नांदेड शहरचे अध्यक्ष म्हणून सार्वजनिक जीवनात प्रवेश केलेल्या अशोकराव चव्हाण यांनी महसूल, उद्योग, परिवहन, नगरविकास, सांस्कृतिक कार्य आदी महत्त्वाच्या खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. ८ डिसेंबर २००८ ते ९ नोव्हेंबर २०१० या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासाला दिशा दिली.
राजकीय कार्यासोबतच नांदेडच्या सांस्कृतिक, क्रीडा व विकासात्मक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून, आजही देशभरात “अशोकराव यांचे नांदेड” अशी शहराची ओळख निर्माण झाली आहे.
सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ, प्रेरणादायी व प्रभावी कार्याचा गौरव म्हणून दिला जाणारा हा सन्मान नांदेडकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद असून, अशोकराव चव्हाण यांच्या संमतीमुळे “नांदेड भूषण” पुरस्काराची उंची आणखी वाढल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

