श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| किनवट-माहूर तालुक्यात ऋतूप्रमाणे अनेक नेतेमंडळी व कार्यकर्त्यांची या पक्षातून त्या पक्षात जाण्याची चढाओढ सुरू आहे.या आयाराम-गयारामांची प्रत्येक निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळी भूमिका पाहून या संघातील मतदारांची करमणूक होत आहे. काही कार्यकर्ते असे आहेत की, ज्यांना घरात कोणीच विचारत नाही, असेही निवडणुकीच्या निमित्ताने स्वतःचे महत्त्व वाढवताना दिसत आहेत.
किनवट-माहूर संघात राजकारण दर निवडणुकीच्या निमित्ताने विविध घडामोडींनी गाजते.प्रत्येक निवडणुकीमध्ये नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांची भूमिकाही वेगवेगळी असते. ‘एकनिष्ठ’ हा शब्द माहूर व किनवट मतदार संघातील राजकारण्यांनी वाळीत टाकलेला आहे. जनतेला गृहित धरून जसे आपल्याला सोयीचे होईल, तसे राजकारण करण्यात नेतेमंडळी मग्न असतात. त्यामुळे वेगवेगळ्या निवडणुकीत त्यांची भूमिका वेगवेगळी दिसते. नेत्यांप्रमाणेच आता कार्यकर्तेही हुशार झाले असून, तेही आपल्या सोयीचे राजकारण करुण पाहू लागले आहेत.
या विधानसभा निवडणुकीत आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. आपण कोणत्या नेत्याबरोबर राहायचे, म्हणजे आपला फायदा होईल, याचा कार्यकर्ते गांभीर्याने विचार करू लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका सुरू झाल्या आहेत.
सकाळी एका पक्षात संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात
एक कार्यकर्ता सकाळी एका पक्षाबरोबर तर संध्याकाळी दुसया पक्षाबरोबर फिरताना दिसत आहे. ऋतूमानाप्रमाणे कार्यकर्तेही नेत्यांप्रमाणे पक्ष बदल करू लागल्याने जनता मात्र सध्यातरी गमती-जमती बघण्यात मग्न आहे. अनेक नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे जपले, नोकऱ्या लावल्या मात्र याची जाणीव ठेवताना अनेकजण दिसत नाहीत.एकाच घरात बाप एकीकडे, मुलगा एकीकडे तर भाऊ तिसरीकडे असे चित्र आहे. काही कार्यकर्ते तर असे आहेत की, ज्याला घरातली मते पडणार नाहीत, असे कार्यकर्तेही निवडणुकीच्या निमित्ताने माझ्यामागे एवढे मतदान आहे, तेवढे मतदान आहे म्हणत मोठ्या थाटामाटात उमेदवारांच्या भेटी घेत आहेत.