नांदेड, अनिल मादसवार| मराठी लोककलेचा आत्मा असलेल्या लावणीला समाजात सन्मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान मिळावे, तसेच ही समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने सौ. प्रगती बालाजी निलपत्रेवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला “लावण्यखणी” हा भव्य सांस्कृतिक लावणी कार्यक्रम रविवारी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात अत्यंत उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. गच्च भरलेल्या सभागृहातील महिला-पुरुष रसिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोककलेवरील आपले प्रेम व्यक्त केले.


या कार्यक्रमाचे आयोजन प्रसाद व अथर्व निलपत्रेवार यांनी केले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पारंपरिक पद्धतीने नटराज पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणिता देवरे यांच्या हस्ते पार पडले, तर उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम हे होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून लायन्स क्लबचे उपप्रांतपाल योगेश जायस्वाल, प्रसिद्ध निवेदक ॲड. गजानन पिंपरखेडे, सहयोग शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा हंबर्डे, मनपा सहाय्यक आयुक्त राजेश जाधव, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जुगल धुत हे मान्यवर उपस्थित होते.


शुभेच्छा व्यक्त करताना प्रणिता देवरे यांनी लावणी या पारंपरिक लोककलेला सुसंस्कृत व सन्माननीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी निलपत्रेवार कुटुंबाने केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. लावणी ही केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून ती मराठी संस्कृती, लोकजीवन व परंपरेचे जिवंत प्रतिबिंब असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रगती निलपत्रेवार यांनी लावणीसारख्या लोककलेचे जतन व संवर्धन, कलाकारांना मानाचे व्यासपीठ आणि रसिकांना दर्जेदार सादरीकरण मिळावे, या भूमिकेतून “लावण्यखणी” हा उपक्रम राबविल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी बालाजी निलपत्रेवार यांनी उपस्थित मान्यवर, कलाकार, सहकारी व रसिक प्रेक्षकांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी अभ्यासपूर्ण, विनोदी व ओघवत्या शैलीत करत कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली.
कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस अशा लावण्यांचे सादरीकरण झाले. पारंपरिक वाद्यांच्या तालावर, ठसकेबाज पावलांतून व भावपूर्ण अभिनयातून सादर झालेल्या लावण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट मिळाला, तर अनेक लावण्यांना “वन्स मोअर”ची मागणी करण्यात आली.
लावणी क्वीन भाग्यश्री मुंबईकर, अकलूज लावणी स्पर्धेची आठ वेळा विजेती सोनी सोलापूरकर, अटॅम गर्ल पल्लवी जाधव, तसेच अश्विनी, श्रद्धा व त्यांच्या संचाने सादर केलेल्या दर्जेदार, तालबद्ध व प्रभावी लावण्यांनी सभागृहात उत्साहाची लाट उसळली. विशेष म्हणजे तरुणाईसोबतच ज्येष्ठ रसिक, महिला व कुटुंबीयांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती, ज्यामुळे लावणीला सुसंस्कृत व सन्मानाचे व्यासपीठ मिळाल्याचे चित्र दिसून आले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून लावणी कलाकारांना सन्मानाचे व सुरक्षित व्यासपीठ मिळावे, हा आयोजकांचा मुख्य उद्देश यशस्वीरीत्या साध्य झाल्याचे दिसून आले. कलाकारांच्या सादरीकरणाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता लावणी या लोककलेविषयी समाजातील आपुलकी अधिक दृढ होत असल्याचे जाणवले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मभूषण ॲड. दिलीपभाऊ ठाकूर, कर्मा प्रोडक्शनचे संतोष तरटे, प्रकाश जिंदम, लक्ष्मण बोडलवार, संतोष मुगटकर, टायगर ग्रुपचे बाळासाहेब जाधव, एपीआय संजय निलपत्रेवार, कायरा एनएक्सचे साईनाथ नागठाणे, वेंकटेश पुलकुंटवार, सत्यजित टिप्रसवार, माधव कोल्हे, रुक्मिणी निलपत्रेवार व माणिक गीते यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर रसिकांनी आयोजकांचे मनापासून अभिनंदन करत भविष्यातही अशाच दर्जेदार, सांस्कृतिक व लोककलेला प्रतिष्ठा देणाऱ्या कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. “सांस्कृतिक लावण्यखणी” या कार्यक्रमाने केवळ मनोरंजन न करता मराठी सांस्कृतिक परंपरेचा अभिमान जागविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त झाली.

