Lavanya khani Program : “लावण्यखणी” : लावणीला सन्मानाचे व्यासपीठ देणारा भव्य सांस्कृतिक सोहळा
नांदेड, अनिल मादसवार| मराठी लोककलेचा आत्मा असलेल्या लावणीला समाजात सन्मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान मिळावे, तसेच ही समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने सौ. प्रगती बालाजी निलपत्रेवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला “लावण्यखणी” हा भव्य सांस्कृतिक लावणी कार्यक्रम रविवारी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात अत्यंत उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. गच्च भरलेल्या सभागृहातील महिला-पुरुष रसिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोककलेवरील आपले प्रेम व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रसाद व अथर्व निलपत्रेवार यांनी केले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पारंपरिक पद्धतीने नटराज पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणिता देवरे यांच्या हस्ते पार पडले, तर उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम हे होते.
...
