हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनही प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अपुरा वैद्यकीय अधिकारी व परिचारिका स्टाफ, लाखो रुपयांची आधुनिक यंत्रसामग्री बंद अवस्थेत धूळखात पडलेली आणि जवळपास दोन वर्षांपासून कोट्यवधींची नवी इमारत ताब्यात न दिल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गोरगरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे.


शहर व ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येतात; मात्र येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व पुरेसा स्टाफ नसल्याने रुग्णांना उपचाराविना परत पाठवले जात असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. एक्स-रे, ईसीजी, सोनोग्राफीसारख्या तपासण्या उपलब्ध नसल्याचे सांगून रुग्णांना खासगी दवाखान्यांकडे वळवले जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी व ईसीजीसाठी आवश्यक असलेली लाखो रुपयांची यंत्रे रुग्णालयात उपलब्ध असूनही ती बंद अवस्थेत पडून आहेत. डिजिटल एक्स-रे मशीन आजतागायत सुरूच करण्यात आले नसल्याची माहिती आहे.

हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनही वैद्यकीय स्टाफमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सकाळच्या ओपीडीपासून सायंकाळपर्यंत १२ सिस्टरचा स्टाफ मंजूर असताना प्रत्यक्षात केवळ ४ सिस्टरवर संपूर्ण रुग्णालयाचा भार टाकण्यात आला आहे. परिणामी रुग्णांची तपासणी केवळ औषधोपचारापुरती मर्यादित राहिली असून आवश्यक तपासण्या होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातून येणाऱ्या रुग्णांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.


दरम्यान, जुन्या इमारतीलगत जवळपास दोन कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेली नवी भव्य इमारत पूर्ण होऊनही अद्याप रुग्णालयाच्या ताब्यात देण्यात आलेली नाही. इमारतीच्या बांधकामात बोगसपणा झाल्याचा आरोप केला जात असून, लिफ्ट असूनही ती बसविण्यात आलेली नाही. पावसाळ्यात संपूर्ण इमारत गळत असल्याने नांदेड व हिमायतनगर येथील ठेकेदाराने केलेल्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. एकीकडे रुग्णांसाठी जागा अपुरी असताना ही इमारत धूळखात का ठेवली आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


मागील काळात जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णालयास भेट दिल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना अमलात आलेली नसल्याचे वास्तव आहे. आधुनिक सुविधा असूनही केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा व वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
या गंभीर बाबीकडे जिल्हा शल्यचिकित्सक साहेबांनी तातडीने लक्ष देऊन वैद्यकीय अधिकारी व स्टाफची भरती करावी, बंद पडलेली यंत्रसामग्री सुरू करावी आणि नव्या इमारतीचा त्वरित ताबा रुग्णालयाला द्यावा, आणि गुत्तेदाराने केलेल्या इमारतीच्या बांधकामाची गुण नियंत्रण मापक मशीनद्वारे तपासणी करावी अशी जोरदार मागणी नागरिक व रुग्णांकडून होत आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही सामाजिक संघटनाकडून देण्यात येत आहे.

