कंधार (सचिन मोरे) कंधार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अब्दुल मन्नान चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच दोन स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत उर्फ स्वप्निल पाटील लुंगारे तर काँग्रेसचे निष्ठावंत माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद हमीद सुलेमान यांची बिनविरोध निवडीची घोषणा पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष शहाजी अरविंदराव नळगे यांनी जाहीर केली.


नगरपरिषद कंधारची प्रथम सर्वसाधारण सभा गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता नगराध्यक्ष शहाजी अरविंदराव नळगे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडली. सदर सभेचे आयोजन उपनगराध्यक्ष निवड तसेच दोन स्वीकृत सदस्य निवडीच्या अनुषंगाने करण्यात आले होते. उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अब्दुल मन्नान मोहम्मद सरवर चौधरी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने, पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांनी त्यांची बिनविरोध उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

तसेच नगरपरिषद कंधारसाठी दोन स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हनुमंत ऊर्फ स्वप्नील विश्वनाथ लुंगारे तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे मोहम्मद हमीद सुलेमान यांची स्वीकृत सदस्य म्हणून या दोघांचे अर्ज प्राप्त झाले. त्यांचा बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष शहाजी अरविंदराव नळगे यांनी केली. सभेचे सचिव तथा मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी उपनगराध्यक्ष व सर्व नवनिर्वाचित सदस्य व स्वीकृत सदस्यांचा अधिकृत पदभार कार्यान्वित झाल्याचे जाहीर केले.


सर्वसाधारण सभा शांततेत व पूर्णतः लोकशाही पद्धतीने पार पडली. नगरपरिषदेच्या विकासात्मक कामकाजात नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांचे योगदान मोलाचे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सभेच्या शेवटी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली. या निवडीची घोषणा होताच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून ढोल ताशाच्या गजरात मोठा जल्लोष साजरा केला


