नांदेड l भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा नवपिढीने जोपासण्याची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा सौ.प्रांजलीताई रावणगांवकर यांनी केले.


विश्वरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना आज महापरिनिर्वाणदिनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगांवकर यांच्या जिल्हा संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.


पूढे बोलतांना महिला जिल्हाध्यक्षा सौ.प्रांजलीताई रावणगांवकर म्हणाल्या की, प.प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेचे चटके सहन करुन प्रतिकुल परिस्थितीवर मात करित शिक्षण घेतले व आपल्या भारत देशाला जगात सर्वश्रेष्ठ असलेलं भारतीय संविधान दिलं.या संविधानाने आपल्या देशातील प्रत्येकाला मान,सन्मान व समानतेचा हक्क दिला.समता, स्वातंत्र्य,बंधूता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना यामध्ये सर्वोच्च स्थान देऊन त्यांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला.


आयुष्यभर अस्पृश्यतेचे चटके सहन करणार्यांना मायेची सावली देतांनाच भारतीय समाजमनातील प्रत्येक माणसाला त्यांनी माणुस बनविलं. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या शिकवणीतून त्यांनी आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला असून त्यांच्यामुळेच या देशातील सर्व समाजघटकांची व मुख्यत्वे आम्हा महिलांची प्रगती झाली आहे.त्यांच्या प्रेरणादायी कार्य व कर्तत्वाचा वारसा नवपिढीने जोपासण्याची गरज असून
शिव-फुले-शाहू-आंबेडकर आदी महामानवांच्या पुरोगामी विचाराचा वारसा रुजविण्याचा प्रयत्न माजी केंद्रीय कृषीमंत्री व पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आपण करित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पक्षाचे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस डॉ.परशुराम वरपडे,बालासाब मादसवाड,सुभाष रावणगांवकर,राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे,जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग शिंदे,नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नाना पोहरे,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकते,शंकरराव इंगळे,जीवन वडजे,पद्माकर काशिद,विश्वांभर भोसीकर, दिगांबर गवळे, संगीता सुर्यवंशी,माणिक बोडके,नारायण काबळे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.


