नविन नांदेड| देशाच्या सर्वोच्च पदावर एका आदिवासी लाडक्या बहिणीची आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा संदेश दिला आहे. त्यांचा हा निर्णय सर्व मागास जाती- जमाती व सर्व महिलांच्या प्रगतीमध्ये अमुलाग्र बदल करणारा ठरेल व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढेल असे उद्गार श्री संत रोहिदास महाराज मंदिर तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेडचे मागील 40 वर्षापासूनचे संस्थापक सचिव वामनराव विष्णुपूरीकर यांनी दै. प्रजावाणी नांदेड दि. 29 जुलै 2022 रोजीच्या माध्यमातून व्यक्त केले होते.
सदरील तिर्थक्षेत्राचे प्रमुख विश्वस्त, तत्कालीन सरपंच व उपसरपंच यांनी आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील मॅडम, तत्कालीन राष्ट्रपती भारत सरकार यांची त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा पास क्रं. 002549 अन्वये दि. 3 नोव्हेंबर 2008 रोजी रितसर प्रत्यक्ष भेट घेऊन तिर्थक्षेत्राच्या विकास विषयक व समाजाच्या व गावाच्या प्रश्नांबाबत दहा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते. सततच्या पाठपुराव्यानंतर सुद्धा त्या मागण्या आजपावेतो शासन स्तरावर प्रलंबित आहेत. दि. 30 जुलै 2024 रोजी देशाच्या राष्ट्रपती आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या प्रथमच मराठवाड्यातील नांदेड दौर्यावर येणार आहेत.
महाराष्ट्र राज्यात श्री संत रोहिदास महाराज यांचे एकमेव तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेड येथे असून सदरील तिर्थक्षेत्रास नांदेड दौर्या दरम्यान सोयीनुसार धावती भेट मिळावी व आशीर्वाद लाभून मार्गदर्शन मिळावे अशी विनंती सदर तिर्थक्षेत्राचे संस्थापक वामनराव विष्णुपूरीकर यांनी द्रुतगती पोस्टाद्वारे दि. 23 जुलै 2024 रोजी आदरणीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना केली असून मा. जिल्हाधिकारी नांदेड श्री. अभिजीत राऊत यांच्या मार्फत दहा मागण्यांसह 8 पानांचे निवेदन मा. राष्ट्रपती महोदया यांना सादर करण्यात आले आहे.