हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, संबंधित पोलीस यंत्रणा व दारूबंदी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दारू विक्रेत्यांचे फावले जात असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. हिमायतनगर तालुक्यातील गावोगावी खुलेआम अवैध दारूची विक्री सुरू असून, काही ठिकाणी तर दिवसाढवळ्या दारूचे अड्डे चालवले जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे.


दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या कुटुंबप्रमुखांच्या कमाईचा मोठा हिस्सा दारूवर खर्च होत असल्याने अनेक घरांमध्ये चूल पेटणेही कठीण झाले आहे. परिणामी, लाडक्या बहिणींना सुखाचे दोन घास मिळणेही दुर्मिळ झाले असल्याचे विदारक वास्तव खेड्यापाड्यात पाहायला मिळत आहे.

दारूबंदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात अवैध दारूचा व्यवसाय वाढून शासनाकडे महसूल अधिक जात असल्याच्या भ्रमात प्रशासन ‘मायेच्या झुल्यावर’ झोपले असल्याची तीव्र चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे.


नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढले आहे. काही ठिकाणी घरातूनच दारू विक्री सुरू असून, याचा विपरीत परिणाम महिलांवर, मुलांवर तसेच अल्पवयीन तरुणांवर होत असल्याचे बोलले जात आहे.

दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांमध्ये वाद, भांडणे, आर्थिक अडचणी निर्माण होत असून घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. शेतमजूर व मजूर वर्ग आपल्या कष्टाच्या कमाईचा मोठा हिस्सा दारूवर खर्च करत असल्याने कुटुंबाचा गाडा हाकणे अवघड बनले आहे.
या पार्श्वभूमीवर हिमायतनगर पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, नियमित छापे टाकून दारूचे अड्डे उद्ध्वस्त करावेत आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
वेळीच ठोस कारवाई न झाल्यास भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून तात्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

