हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील पंचायत समिती सभापती पदासाठी राजकीय तापमान वाढले आहे. पंचायत समितीतील सभापती पदाची सोडत जाहीर झाली असून, हे पद अनुसूचित जाती (पुरुष) प्रवर्गासाठी राखीव सुटले आहे. त्यामुळे या पदावर बसण्यासाठी विविध पक्षांतील अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली असून, “सभापती” होण्याचे स्वप्न अनेकांच्या डोळ्यांत आहे.


हिमायतनगर तालुक्यात सध्या दोन जिल्हा परिषद गट आणि चार पंचायत समिती गण आहेत. सोमवारी चार पं. स. गणांची आरक्षण सोडत होणार असून, अनुसूचित जातीसाठी कोणता गण राखीव होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सोडतीनंतर सभापती पद कोणत्या गणाचा होणार हे स्पष्ट होईल.

गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे पंचायत समितीवर प्रशासन कारभार सुरू होता. परिणामी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या अनेक विकासकामांना विलंब झाला होता.


दि. १० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा नियोजन भवनात विविध पंचायत समित्यांसाठी सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत पार पडली. यामध्ये हिमायतनगर पं. स. चे सभापती पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे. आता सोमवारी होणाऱ्या गण आरक्षण सोडतीनंतरच अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार असले तरी सध्या हिमायतनगर तालुक्यात “सभापती पदाचे डोहाळे” अनेकांना लागले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.


