हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने हिमायतनगर पोलिस ठाण्यात सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांची शांतता कमिटी बैठक घेण्यात आली.


या बैठकीत पोलिस निरीक्षक अमोल भगत यांनी सर्व उमेदवारांना निकालाच्या दिवशी संयम राखण्याचे, विजय-पराजय स्वीकारून लोकशाही मूल्यांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. आनंदोत्सव साजरा करताना किंवा निषेध व्यक्त करताना कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच मिरवणुका, घोषणाबाजी, फटाके, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरवणे याबाबत कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला. पोलिस प्रशासनाकडून शांतता राखण्यासाठी आवश्यक खबरदारी व बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.


बैठकीस सर्व पक्षांचे उमेदवार, प्रतिनिधी व पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक निकालाच्या दिवशी शांतता, सलोखा व कायद्याचे पालन करण्याचा सर्वांनी संकल्प व्यक्त केला.


