हिमायतनगर (अनिल मादसवार) राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुका जाहीर करताच हिमायतनगर शहरातील राजकीय तापमान झपाट्याने वाढले आहे. सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीसाठी धाव घेत असून, प्रत्येक जण आपले वर्चस्व दाखवून “स्वबळाचा नारा” देत आहे. त्यामुळे या निवडणुकीत युती टिकणार की सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मागील लोकसभा व विधानसभा निवडणुका महायुती व महाआघाडीच्या पद्धतीने झाल्या असल्या, तरी हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक मात्र त्या धर्तीवर होईल असे सध्या तरी दिसत नाही. वरिष्ठ पातळीवर महायुतीकडून एकत्र लढण्याचा निर्णय झाला तरी स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे वेगळी असल्याचे चित्र आहे. हिमायतनगर नगरपंचायतीवर सुरुवातीची अडीच वर्षे काँग्रेस पक्षाची सत्ता होती.

मात्र, काही बंडखोर नगरसेवकांच्या विरोधामुळे पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष पद शिवसेनेच्या वाट्याला आले. मागील पंचवार्षिक काळात काँग्रेस व शिवसेना यांनी अडीच-अडीच वर्ष सत्ता सांभाळली. त्या काळातील विकासकामे, अपूर्ण नळयोजना आणि शहरातील स्वच्छतेचा बोजवारा, जनतेच्या आरोग्याचा प्रश्न, हेच यंदाच्या निवडणुकीचे प्रमुख मुद्दे ठरण्याची शक्यता आहे.


स्थानिक राजकारणात वर्तमान आमदार बाबुराव कदम कोहळीकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजपचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, तसेच माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, या नेत्यांचे लक्ष या निवडणुकीकडे केंद्रित झाले आहे. सत्ता खेचून घेण्यासाठी सर्वच पक्षांतून रणनीती आखली जात आहे.

दरम्यान, निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती व प्रस्तावांची छाननी सुरू केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काहीजणांचे नवीन प्रवेश, तर काहींची पक्षातून गळतीही सुरू असल्याने समीकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. त्यामुळे युती टिकेल की स्वबळावर लढत होईल, हे सांगणे सध्यातरी कठीण झाले आहे.
महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे घटक पक्ष एकत्र लढतील की स्वतंत्र, यावरही संभ्रम कायम आहे. काँग्रेसकडून माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेबांधणी सुरू आहे, आणि नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, एमआयएमकडून देखील नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास काँग्रेसच्या मतविभाजनावर थेट परिणाम होऊ शकतो.
तर महायुती म्हणजे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याकडूनही नगराध्यक्ष पदासाठी अनेक दावेदार समोर येत आहेत. मात्र अंतिम उमेदवार ठरवताना मतदारांशी थेट संपर्क व स्थानिक लोकप्रियता निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यासह विविध पक्षाकडूनही उमेदवार उतरविले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच, हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, युती की स्वतंत्र लढत — हा मोठा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे.
नगरपंचायतीचा पूर्ण कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून निवडणूक रखडली असून, प्रशासकीय कारभार सुरु आहे. आगामी निवडणुकीत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जनतेतूनच निवडला जाणार असून, नगरसेवकही लोकनियुक्त पद्धतीने ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात असून कार्यकर्त्यांची चळवळ सुरू झाली आहे.

