हिमायतनगर (अनिल मादसवार) सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आभाळात अचानक विजांचा कडकडाट झाला आणि ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने शहर व परिसराचे जनजीवन विस्कळीत केले. नाल्यांना पूर आल्याने शहराच्या रस्त्यावर पाणीच पाणी झाले. बाजार चौक, सराफा लाईन, परमेश्वर कॉम्प्लेक्स, चौपाटी परिसरातील अनेक दुकाने पाण्यात गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वाहन धारकांना पाण्याच्या लोंढ्यातून गाड्या चालविणे कठीण झाले.


गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याखालीच आहेत. सोयाबीन पिके काळवंडून सडली असून, कापसाच्या रोपांची पाने गळून पडल्याने यंदा शेतकऱ्यांच्या हाती काहीही येणार नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.


सुमारे दोन तास चाललेल्या या पावसामुळे ग्रामीण भागातही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतांमधील बांध फुटल्याने खरीप हंगाम उद्ध्वस्त होण्याची शक्यता वाढली आहे. महसूल प्रशासनाकडून अद्याप नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित असल्याची खंत व्यक्त होत आहे.


नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात यंदा सर्वाधिक पाऊस झाला आहे. नदी-नालेकाठच्या जमिनीतील एकही पिक हाती लागणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे हिमायतनगर तालुका आपत्तीग्रस्त घोषित करून नदी-नालेकाठच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के तर उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.


नगरपंचायत प्रशासनावर नागरिकांनी व्यक्त केला संताप
दोन तास चालेल्या मुसळधार पावसाने शहरातील सर्वच रस्ते तलावासारखे भरुन वाहत होते. त्यामुळे शहरातील बाजार चौक, सराफा लाईन, परमेश्वर कॉम्प्लेक्स, मुख्य कमान, चौपाटी परिसरातील अनेक दुकाने पाण्यात गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वाहनधारकांना पाण्याच्या लोंढ्यातून गाड्या चालविणे कठीण झाले. या प्रकारामुळे हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “दरवर्षी पावसाचे पाणी दुकाने व रस्त्यावर शिरते, मात्र नाल्यांचे खोलीकरण, साफसफाई आणि पाणी शहराबाहेर काढण्याबाबत प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही,” असा आरोप व्यापाऱ्यांनी केला.
