हिमायतनगर, अनिल मादसवार | आज हिमायतनगर येथील प्रसिद्ध डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांनी भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे हिमायतनगर भाजपाच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. डॉक्टर वानखेडे सारख्या स्वच्छ प्रतिमेचा व्यक्ती भाजपने निवडला असल्याने यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीत भाजप सत्ता काबीज करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


डॉ. वानखेडे यांचा पक्षप्रवेश हा केवळ औपचारिकता नसून, आगामी हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपासाठी ‘गेमचेंजर’ ठरू शकतो, असे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. भाजपाच्या स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बळकटीत मोठी वाढ होईल, तसेच वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असलेल्या डॉ. वानखेडे यांच्या स्वच्छ प्रतिमेचा फायदा पक्षाला मिळणार आहे.

राजकीय सूत्रांच्या मते, आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून डॉ. वानखेडे यांचे नाव सर्वात आघाडीवर असून, लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपात प्रवेशानंतर कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हिमायतनगरच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.


हिमायतनगरचं राजकारण महामुकाबल्याकडे! हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीमुळे स्थानिक राजकारण मोठ्या लेव्हलवर पोहोचलं असून, यावेळी शहरात दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा थेट पणास लागणार आहे. एका बाजूला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि नांदेड परिसरातील प्रभावी नेता प्रतापराव पाटील चिखलीकर या दोघांच्या प्रतिष्ठेचा थेट सामना आता हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत रंगणार आहे.

दोन्ही गट आपल्या-आपल्या पक्षाचा झेंडा नगरपंचायतीवर फडकवण्यासाठी सर्व ताकदीने मैदानात उतरत असून, यातून हिमायतनगरच्या राजकारणात ऐतिहासिक आणि अत्यंत रोमहर्षक संघर्ष पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने पसरली आहे. हिमायतनगर नगरपंचायत ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था न राहता, आता या दोन heavyweight नेत्यांच्या राजकीय प्रतिष्ठेची कसोटी ठरणार आहे.

