कंधार, सचिन मोरे| गेल्या ४८ तासापासून कंधार तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील चिखली,बोरीचा तलाव फुटला तर ४४ जनावरे वाहून गेले.दोन गावे पुराच्या पाण्याने वेढलेले आहेत.बाधित गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. तसेच तालुक्यातील अतिवृष्ठीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली त्यामुळे शेतकऱ्याचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.


दि.७ आगस्ट च्या रात्रीपासून कंधार तालुक्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे, जवळपास ३० ते ३५ गावात पूर परिस्थितीत निर्माण झाली आहे. तर तालुक्यातील चिखलीचा भवानी तलाव व बोरीचा तलाव फुटला असून नंदनवनच्या तलावास धोका निर्माण झाल्यामुळे सांडवा खोदण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.


तालुक्यातील २१ पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला. लिंबोटी धरणाचे १५ दरवाजे उघडल्यामुळे पुराचे पाणी मन्याडीत सोडल्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. या धरणातील पाण्याचा विसर्ग एक लाख ११ हजार ७२० क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरूच आहे त्यामुळे भूकमारी व तेलूर गाव पाण्याने वेढले गेले होते. या ठिकाणी प्रशासनाने जीवाची बाजी लावत पुरग्रस्थाना बाहेर काढत बारुळ येथे त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.


पिकांचे सरसकट पंचनामे करा.शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर


गेल्या ४८ तासापासून लोहा/कंधार मतदार संघात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रचंड पाऊस या भागात झाला आहे.तालुक्यात सर्व तलाव तुडुंब भरलेले आहेत अनेक गावातील घरामध्ये पाणी घुसल्यामुळे शेकडो घरांची पडझड झाली आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले असून याबाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महसूल मंत्र्यांशी मी संपर्कात असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून त्यांना तात्काळ भरीव मदत देण्याची आग्रही मागणी मी केली आहे.
जगतुंग सागर १०० टक्के तुडुंब भरले – शहराच्या वैभवात भर टाकणारा प्राचीन राष्ट्रकूट कालीन जगतुंग सागर हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे तळ्याच्या पाळू वरून प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या तलावाची पाहणी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे व पोलीस प्रशासनाच्या वतीने दिनांक २९ रोजी जगतुंग सागरास भेट देऊन कोटबजार, मानसपुरी, अशोकनगरच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळाचा आश्रय घ्यावा व स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी असे आव्हान तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले.


