हिमायतनगर, अनिल मादसवार | हवामान विभागाने दिलेल्या ईशाऱ्यांनंतर हिमायतनगर शहर व परिसरात दोन दिवसापासून पावसाची संतांतधार सुरु आहे, शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः तांडव माजवला आहे. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पळसपुर येथील नागनाथ मंदिरावर वीज कोसळ नुकसान झाले तर शहर व तालुक्यातील रस्त्यांना व शेतीना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.



सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेकडो घरांमध्ये व बाहरपेठेतील दुकानामध्ये पाणी शिरले असून, गृहउपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली आहे.दरम्यान, मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेती जलमय झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गावोगाव नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. तर अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली असून विज पुरवठा खंडित झाला आहे.


श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानंतर मध्यरात्री पासून अवकाळी पावसाने नागरिकांना मोठ्या संकटात टाकले असून, प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील मौजे पळसपुर येथील नागनाथ मंदिरावर वीज कोसळून कळसाचा काही भाग फुटला आहे यामुळे मंदिराचे नुकसान झाले आहे.



नडव्याच्या पुलावरुन पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले: नागरिकांच्या जीवाला धोका!
हिमायतनगर शहरातून विदर्भ, उमरखेड, ढाणकीकडे जाणाऱ्या मार्गावरील नडव्याच्या पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण असल्याने आज झालेल्या मुसळधार पावसाने पुलावरून महापूर वाहू लागला आहे, त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि वरद विनायक भक्तांना अडचण निर्माण झाली असून, परिसरातील शंकर नगर, बजरंग चौक परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे पुलावरून पाणी जात असल्याने दळण वळणात अडथळे, अपघाताचा धोका निर्माण होऊन नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. तात्काळ पुलाचे काम पूर्ण करून नागरिक, भाविक व विद्यार्थ्यांची अडचण दूर करावी आणि नुकसान झालेल्या नागरिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतं आहे.

हिमायतनगर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर हिमायतनगर जवळगाव नजीक हदगाव– हिमायतनगर मार्ग पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी जमल्याने सकाळपासून वाहतूक ठप्प झाली असून, एक थार गाडी पाण्यावर तरंगात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एकूणच जिकडे तिकडे पाऊस जोरात सुरु असल्यामुळे नागरिक व प्रवाशांना व रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पारवा खु गावाला पुराच्या पाण्याचा वेढा गावातील व नवी आबादि परिसरातील लालखान फरीदाखा पठाण, इशुब सय्यद बाबू,हसन रतन शेख, सय्यद मुस्तफा सय्यद, बाबा आली, शेख. रफिक शेख इमाम,आदींसह अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठं नुकसान नागरिकांना घराबाहेर पडावं लागलं अशी माहिती शिवाजी सूर्यवंशी यांनी दिली.

हिमायतनगर तालुक्यातील कारला, मंगरूळ, वडगाव, खैरगाव शिवारात सकाळपासून झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेकडो हेक्टर शेतीतील पिके पावसामुळे खरडून गेली असून, कापूस सोयाबीनचे पिके आडवी झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील शेतकरी नागरिकांनी केली जात आहे.


