नांदेड| शहरात सोमवारी जश्ने ईद मिलाद उन नबी या निमित्ताने ऐतिहासिक व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिलाद कमिटी तर्फे झालेल्या या मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


ही मिरवणूक सकाळी १० वाजता निजाम कॉलनी येथून सुरू होऊन श्रीनगर, आयटीआय, शिवाजी नगर, कला मंदिर, वजिराबाद, शिवाजी पुतळा, गांधी पुतळा, महावीर चौक, गुरुद्वारा चौक, जुना मोंढा, हबीब टॉकीज मार्गे सरकत दुपारी २ वाजता मोहम्मद अली रोड येथे समाप्त झाली.

मिरवणुकीदरम्यान शहरभर “या नबी सलाम अलेक” या गजरासह धार्मिक घोषणा देत वातावरण भक्तिमय करण्यात आले. नात-शरीफ पठण, झंडे, पथक, तांड्या, बॅंड पथके तसेच मुलांचे आकर्षक वेशभूषेत सादरीकरण हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. शहरातील विविध भागात उभारलेल्या स्वागत मंडपांमधून फुलांची उधळण, प्रसाद व शीतपेय वितरण करून सहभागींचे स्वागत करण्यात आले. लहान मुलं व युवकवर्गाचा विशेष सहभाग उल्लेखनीय ठरला.



शांतता व सौहार्द अबाधित राहावे यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. महत्त्वाच्या चौकांवर पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात राहून वाहतूक सुरळीत केली. या भव्य मिरवणुकीमुळे नांदेड शहरात धार्मिक उत्साहाचे व सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले. शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात लावण्यात आलेली प्रकाश सजावट व गेट्स या उत्सवाचे आकर्षण वाढवत होती.


