नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. १४ डिसेंबर रोजी पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेचे उद्घाटन थाटात पार पडले. या निमित्ताने विद्यापीठातील क्रीडा मैदानावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मशाल ज्योत पेटवून, झेंडा फडकावून, हवेत फुगे सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन थाटात पार पडले.
यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, नांदेड गुरुद्वारा लंगरचे बाबा कुलदीपसिंघ, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक अजित पाटील, पॅरा ऑलिंम्पिक अॅथेलेटिक्स खेळाडू भाग्यश्री जाधव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व आंतरराष्ट्रीय पंच अंजली पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व स्पर्धा समन्वयक अंकुश पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे, नारायण चौधरी, डॉ. सिंकू कुमार सिंह, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी मोहम्मद शकील, आंतर विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, क्रीडा विभागाचे प्र. संचालक डॉ. भास्कर माने, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. भास्कर माने यांच्या प्रस्ताविकेनंतर उद्घाटनपर बोलतांना विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप म्हणाले, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कुठलेही यश संपादन करता येते. खेळाडूंनी फक्त प्रमाणपत्र मिळवण्यासाठी न खेळता खेळातील अत्याधुनिक तंत्राचा आणि युक्तीचा वापर करून जिंकण्यासाठी खेळावे. प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी शिकवून जाते, त्या चुकीपासून धडा घेऊन पुढे चुका दुरुस्त करून खेळामध्ये अधिक कुशलता आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहावे. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय सामारोपामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले की, खेळाबरोबरच खेळाडूंनी खेळामध्ये आपल्या नीतीमूल्याची जोपासना करावी. स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कमजोरीचा अभ्यास करून त्यावर विजय मिळवता येतो, पण हे सर्व करत असताना कोणी दुखावणार नाही याची काळजी निश्चितच घेतली पाहिजे.
या सर्व स्पर्धा सुरळीत चालण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली पुढील समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आयोजन स्वागत व शिष्टाचार समिती, तक्रार निवारण समिती, मैदान समिती, तांत्रिक समिती, प्रशिक्षक व खेळाडू निवास समिती, वाहतूक समिती, पात्रता समिती, उद्घाटन व उध्दघोषक समिती, स्वच्छता व सुशोभीकरण समिती, पाणी व्यवस्थापन समिती, भोजन व चहापाणी समिती, वित्त व लेखा समिती, प्रसिद्धी समिती, पंचव्यवस्था समिती, कार्यालय कामकाज समिती, सुरक्षा समिती, वैद्यकीय समिती इत्यादी समित्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी तर आभार प्रदर्शन राजेश कारंजकर यांनी केले.