नांदेड| गावांच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी ग्रामपंचायतींनी सतरा शाश्वत विकास ध्येय आणि नऊ संकल्पना विचारात घेऊन विकास आराखडे तयार करावेत, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन आणि नांदेड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे ग्रामपंचायत विकास आराखडा संदर्भातील दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात श्रीमती करनवाल यांनी ग्रामस्तरावरील योजनांचे नियोजन, अंमलबजावणी व शाश्वत विकासासाठी आवश्यक धोरणांवर मार्गदर्शन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जल जिवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण घुले, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, उप शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांची उपस्थिती होती.
गावांच्या विकासासाठी 15 वा वित्त आयोग, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, ग्राम पंचायत स्वनिधी, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील निधीचा समन्वय साधून विकास आराखडे तयार करण्यात यावेत. या आराखड्यांमुळे गावांचा कायापालट करता येईल, असेही त्या म्हणाल्या.
जिल्हा, तालुका, ग्रामस्तर विकास संकल्पना व आराखड्याबाबत माहिती व नियोजनाशी संबंधित कौशल्य या विषयावर डॉ नंदलाल लोकडे यांनी मांडणी केली. शाश्वत विकासाची 17 ध्येय व 9 संकल्पनाचे स्थानिकीकरण व पीडीआय, यंत्रणाच्या भुमिका आणि जबाबदाऱ्या या विषयावर धनंजय देशपांडे व प्रदीप सोनटक्के यांनी मांडणी केली. विविध शासकीय योजना व कार्यक्रम यांचे एकत्रीकरण व अभिसरण या विषयावर राजेश्वर भुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आज विस्तार अधिकारी व महिला व बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षीका यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.