देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहराचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या पुढाकाराने गेल्या सात वर्षांपासून पारंपरिक उत्साहात साजरा होणारा बत्कम्मा महोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्षीच्या सुंदर बतकम्मा सजावटी स्पर्धेत गोपाल महाराज अग्रवाल ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला, तर महेश आऊलवार ग्रुप द्वितीय, आणि संध्याराणी बादावार ग्रुप तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. या कार्यक्रमात शाहीर रमेश गिरी यांच्या दमदार सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यांच्या लोककला आणि समाजजागृतीवर आधारित सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, काँग्रेस विधानसभा निरीक्षक दिनेश नवघरे, रामदास पाटील सुमठाणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती दादा कांबळे, माजी उपनगराध्यक्ष बालाजी रोयलावार, तालुकाध्यक्षा वन्नाळीकर, काँग्रेस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनोरमाताई निलमवार, तसेच उद्योजक जलील सेठ आदी मान्यवर उपस्थित होते.

सुंदर बतकम्मा स्पर्धेतील इतर पाच स्पर्धक संघांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. त्यामध्ये पुरुषोत्तम बोगुलवार, लिंगाबाई उनग्रतवार, नागनाथ अफसलवार, सविता सिंगेवार आणि राम उरलागोंडावार या संघांचा समावेश आहे. कार्यक्रमात चहा–फराळ, बक्षीस वितरण, तसेच अभिनेते ओम यादव यांचा लोकप्रिय “होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा” हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शहरातील पुरुष मंडळीसह हजारो माता-भगिनींनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कैलास येसगे, माजी उपनगराध्यक्ष बिस्मिल्ला भाई कुरेशी, माजी नगरसेवक मिराभाई, माजी नगरसेवक महेमूद भाई, माजी नगरसेवक शरीफ मामू, अमना भाई, ज्येष्ठ पत्रकार गौतम बनसोडे, माजी उपअधीक्षक रमेश अण्णा कंतेवार, तसेच मोगलाजी अण्णा शिरशेटवार मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.

