गोपाळकाला म्हटले की, उंचच्या उंच हंड्या आणि त्या फोडण्यासाठी जिवाचे रान करणारे तरुण डोळ्यांसमोर येतात; मात्र गोपाळकाला या सणाला आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी असून ते शास्त्र लक्षात घेऊन साजरा केल्याने जिवाला त्याची अनुभूती घेता येते. गोपाळकाल्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि त्याचे लाभ यांविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया.
1. ‘गोपाळकाला’चा अर्थ
अ. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारतांना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला आणि सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.
आ. गोपाळकाला म्हणजे पांढर्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा अधिकाधिक प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा आणि पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समूच्चय. ‘काला’ हा शब्द एकसंध आणि वेगात सातत्य असणार्या क्रियेशी संबंधित आहे. ‘काला’ म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्टपूर्ण कार्य दर्शवणार्या घटनांचे एकत्रिकरण.
पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ आणि स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते. या कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पैलू आध्यात्मिकरीत्या ईश्वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात. ‘गोपाळकाला’ हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो.
2. काल्यातील प्रमुख घटक
पोहे, दही, दूध, ताक आणि लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत.
अ. पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक (काहीही झाले, तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)
आ. दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्या मातृभक्तीचे प्रतीक
इ. दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक
ई. ताक : गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक
उ. लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक
या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.
3. गोपाळकाला, गोपाळकाल्याची दिव्य चव आणि दहीहंडी फोडणे यांचा भावार्थ
अ. गोपाळकाला
दृश्य स्वरूपात गोपाळकाला म्हणजे कीर्तनानंतर किंवा गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी फोडून ग्रहण करतो, तो प्रसाद.
आ. गोपाळकाल्याची दिव्य चव
वरील सर्व पदार्थ एकत्र आणि एकजीव करून ग्रहण केल्यावर त्याची चव अवर्णनीय असते. त्याची चव अतिशय दिव्य असते.
इ. दहीहंडी फोडणे
दहीहंडी हे जिवाचे प्रतीक आहे. दहीहंडी फोडणे, हे जिवाने देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीत स्थिर होणे, या अर्थाने आहे आणि दिव्य चव हे आनंदाचे प्रतीक आहे.
गोपाळकाल्याचे पावित्र्य राखण्यासाठी हे टाळा !
1. लाखो रुपयांच्या दहीहंडी स्पर्धा आयोजित करून केले जाणारे उत्सवाचे व्यापारीकरण !
2. उत्सवासाठी तंबाखू, गुटखा आदींची विज्ञापने किंवा त्यांच्या उत्पादकांचे प्रायोजकत्व !
3. या निमित्ताने होणारी वाटमारी, मद्यपान, बीभत्स नाच, पाण्याचे फुगे मारणे व महिलांची छेडछाड !
4. 40 फुटांहून अधिक उंचीवरील दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांची धोकादायक कसरत !
हिंदुनो, गोपाळकाल्यातील अपप्रकार रोखण्यासाठी हे करा !
1. वाटमारी, महिलांची छेडछाड आदी अपप्रकार आढळल्यास पोलिसांत तक्रार करा !
2. गोकुळाष्टमी उत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांना भेटून अपप्रकारांविषयी त्यांचे प्रबोधन करा !
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
संपर्क- ९२८४०२७१८०