नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव यावर्षी सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड येथे येत्या ऑक्टोबर मध्ये संपन्न होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या या युवक महोत्सवाला ‘ज्ञानतीर्थ’ असे नाव कायमस्वरूपी देण्यात आले आहे.
‘ज्ञानतीर्थ’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये एकूण ३० कला प्रकारांचे सादरीकरण होणार असून, विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चार जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयातील जवळपास १८०० विद्यार्थी, विद्यार्थिनी कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत.
विद्यार्थी कलावंतासाठी युवक महोत्सव हे हक्काचं कलापीठ असते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव मिळावा व उत्साही वातावरणात हा महोत्सव पार पडावा या दृष्टीने विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्वच महाविद्यालयांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव व आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी गिरगावकर यांनी केले आहे.
सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड येथे संपन्न होणाऱ्या या युवक महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच महाविद्यालयांनी आपल्या प्रवेशिका दि. २८ सप्टेंबर पर्यंत विद्यार्थी विकास विभागात सादर कराव्यात. उशिरा आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे महाविद्यालयांना कळविण्यात येत आहे.