बिलोली तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक जीवनात दीर्घकाळ प्रभावी योगदान देणारे समाजवादी विचार- सरणीचे ज्येष्ठ नेते, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी गंगाधरराव म्हाळप्पा पटणे यांचे अश्विनी हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बिलोली तालुक्याने केवळ एक माजी लोकप्रतिनिधी नाही, तर निर्भीड विचारांचा, तत्त्वनिष्ठ आणि जनसामान्यांशी घट्ट नाळ जुळवून ठेवणारा एक संवेदनशील नेतृत्वकर्ता गमावला आहे.


गंगाधरराव पटणे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. पत्रकारिता, राजकारण, समाजकारण आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांनी दैनिक मराठवाडा या वृत्तपत्रात बातमीदार म्हणून कार्य केले. त्याचप्रमाणे दैनिक प्रजावाणीमध्ये त्यांचे विचारप्रधान लिखाण नियमितपणे प्रकाशित होत असे. शब्दांमधून सत्य मांडण्याची, अन्यायावर बोट ठेवण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची त्यांची शैली प्रभावी होती.

सुधाकरराव डोईफोडे, नंदकुमार देव, रामेश्वर बियाणी यांच्यासारख्या समविचारी मित्रांसोबत त्यांची वैचारिक मैत्री होती. साप्ताहिक जनक्रांतीच्या माध्यमातून त्यांनी समाजवादी विचारांचे, ग्रामीण प्रश्नांचे आणि सामान्य माणसाच्या वेदनांचे विपुल लेखन केले. पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून सामाजिक बांधिलकी आहे, हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून जपला.


राजकीय जीवनात गंगाधरराव पटणे यांनी बिलोली नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे कार्य करताना लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श घालून दिला. पाणी, रस्ते, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत नागरी सुविधांवर त्यांनी विशेष भर दिला. सामान्य नागरिक सहजपणे आपली समस्या मांडू शकेल, अशी त्यांची कार्यपद्धती होती. त्यामुळे ते केवळ सत्तेतील नेते न राहता जनतेचे आपलेपणाचे नेतृत्व बनले.

विधान परिषद आणि विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी बिलोली तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने आवाज उठवला. सभागृहात स्पष्ट मत मांडणे, प्रश्न विचारणे आणि गरज पडल्यास सत्ताधाऱ्यांशी मतभेद नोंदवणे, यात त्यांनी कधीही संकोच केला नाही. कोणत्याही राजकीय दबावाला न झुकता स्वतंत्र विचारसरणी जपणारे नेते म्हणून त्यांची ख्याती होती.
शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, या ठाम विश्वासातून त्यांनी आंतरभारती शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. दर्जेदार शिक्षण, संस्कार आणि सामाजिक भान यांचा समन्वय साधण्याचा त्यांचा प्रयत्न शैक्षणिक क्षेत्रासाठी मोलाचा ठरला. त्यांच्या या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत गंगामाता शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने “बिलोली भूषण पुरस्कार” नुकताच जाहीर करण्यात आला होता. हा सन्मान म्हणजे त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याची पोचपावतीच होती.
राष्ट्रीय पातळीवरही गंगाधरराव पटणे यांचे राजकीय संबंध दृढ होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच ज्येष्ठ नेते शंकराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मात्र मोठ्या नेत्यांच्या सान्निध्यात असूनही त्यांनी आपली वैचारिक स्वायत्तता कधीही सोडली नाही. स्पष्टवक्तेपणा, समाजवादी मूल्यांवरील निष्ठा, आणि सामान्य माणसाच्या बाजूने ठाम उभे राहणे, हीच त्यांच्या राजकारणाची ओळख होती.
गंगाधरराव पटणे यांचे निधन म्हणजे एका युगाचा अंत आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही. मात्र त्यांनी जपलेली मूल्ये, त्यांनी उभे केलेले संस्थात्मक कार्य आणि त्यांनी दिलेला वैचारिक वारसा बिलोली तालुक्याच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील. ते विचारांमध्ये, लेखनात आणि जनतेच्या मनात कायम जिवंत राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली.
लेखक — गोविंद मुंडकर, बिलोली

