नांदेड, गोविंद मुंडकर| गणेशोत्सव विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांनी पथसंचलन केले. मा. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन शहरातील इतवारा पोलीस स्टेशन – इतवारा बाजार – सराफा – बर्की चौक – जुना मोंढा – वजीराबाद कलामंदिर – शिवाजी नगर – आयटीआय चौक या मार्गावर पार पडले.


गणेशोत्सव बंदोबस्त अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत शांतता समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या असून, नागरिक आणि गणेश मंडळांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पथसंचलनात अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी परमेेश्वर वेंजने, प्रशांत शिंदे यांच्यासह पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, 150 पोलीस अंमलदार, 100 होमगार्ड, 2 RCP प्लाटून, 1 QRT प्लाटून, वज्र वाहन आणि दोन थार वाहने सहभागी झाली.


जिल्ह्यात एरिया डॉमिनेशन अॅक्टिव्हिटी सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडक खबरदारी घेतली जात आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना “भयमुक्त व DJ मुक्त गणेशोत्सव” साजरा करण्याचे आवाहन केले आहे.



