अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. – संपादक
किती वाजता उठायचे हे रात्री मनाला सांगितले की,त्या वेळेस आपोआप अलार्म वाजल्या सारखी जाग येते ही मला चांगली सवय लागली आहे. मध्यरात्री दोनच्या आधीच जाग आली. हॉटेलच्या काउंटरवर फोन करून सर्वांना वेकअप कॉल करण्यास सांगितले. तीन वाजता सर्वजण हॉटेलच्या लॉबीमध्ये जमा झालो. आम्ही केलेल्या दोन बस वाट पाहत उभ्याच होत्या. पंधरा मिनिटात आम्ही सर्वजण राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद येथे पोंहचलो. बहुतेकांनी यापूर्वी विमान प्रवास केलेला होता. जे टुरिस्ट पहिल्यांदा विमानात बसणार होते त्यांना संदीप मैंद,जयंत वाणी व माझ्यासोबत राहण्याच्या सूचना दिल्या. हैदराबाद विमानतळाचे भव्य दिव्य स्वरूप पाहून पहिलटकर एकदम खुश झाले. ऍडव्हान्स बुकिंग करून देखील आमचे येणे जाण्याचे भाडे प्रत्येकी बावीस हजाराच्या आसपास लागले होते. एवढ्या सकाळी विमानतळावर आम्ही दिलेला नाष्टा महाग असला तरी दर्जेदार असल्यामुळे सर्वांना आवडला. विमानतळावरील सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही सकाळी सहाच्या सुमारास पोर्ट ब्लेअर कडे सॉरी श्री विजयपूरम कडे झेप घेतली. आक्रात्यांच्या खुणा बदलण्यासाठी मोदी सरकारने पोर्ट ब्लेअर च्या नावात श्री विजयपूरम असा केलेला बदल स्तुत्यचआहे.
सकाळी पावणे नऊच्या सुमारास पायलट ने घोषणा केली की,आमचे विमान अंदमान बेटावर उतरणार आहे. अथांग समुद्रात जागोजागी वसलेल्या छोट्या छोट्या बेटांचे विहंगम दृश्य अतिशय मनमोहक होते. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर असलेला स्वातंत्र्यवीरांचा आकर्षक पुतळ्याच्या पाया पडलो. सर्वांनी सेल्फी काढल्या.ग्रुप फोटो काढल्यानंतर आम्ही चार टेम्पो ट्रॅव्हल्स ने हॉटेल कडे निघालो. विमानतळासमोरच असलेल्या ईस्टर्न गेट ह्या थ्री स्टार हॉटेल मध्ये आमच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चेक इन टाईम बाराचा असला तरी संदीपजींच्या विनंतीवरून हॉटेल मॅनेजमेंट ने आम्हा सर्वांना अर्ध्या तासात रूम दिल्या. हे हॉटेल देखील अतिशय उच्च दर्जाचे असल्यामुळे सर्वजण खुश झाले. सकाळी दोन वाजता उठावे लागल्यामुळे झोप व्यवस्थित झाली नव्हती म्हणून मनसोक्त झोप काढली. चविष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन दुपारी तीन वाजता आम्ही हॉटेल सोडले.
सेल्युलर जेल बघण्यासाठी जाणार म्हणून सर्वजण उत्साहित झालो होतो. जेलच्या बाहेर ग्रुप फोटो काढल्यानंतर प्रत्येकी वीस रुपये शुल्क देऊन आम्ही या ऐतिहासिक इमारतीत प्रवेश केला. आपसात विभागणी केलेल्या तिन्ही गटासाठी स्वतंत्र गाईड ची व्यवस्था केली होती. आमच्या सोबत असलेल्या मुस्तफा गाईडने सुरुवातीला अखंड ज्योती जवळ नेले. बाजू बाजूला दोन अखंड ज्योती जळत असलेल्या पाहून मी त्यांना हा काय प्रकार आहे याची चौकशी केली. मणीशंकर अय्यर हे पेट्रोलियम मंत्री असताना पहिल्या अखंड ज्योती ची त्यांनी व्यवस्था केली होती. पण त्यावर गांधीजींचे विचार लिहिलेले होते. अनेकांची इच्छा होती की, सेल्युलर जेलचा संबंध स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असल्यामुळे अखंड ज्योती वर सावरकरांचे विचार असायला हवे. त्यामुळे अटलजी चे सरकार आल्यानंतर आणखी एक अखंड ज्योती निर्माण करण्यात आली .त्यावर मात्र सावरकरांचे विचार कोरण्यात आले. सेल्युलर जेल म्हणजे क्रांतिकारकांनी भोगलेल्या नरक यातनांचे प्रत्यक्ष दर्शन. गाईडने दिलेली माहिती व रात्री पाहिलेला लाईट अँड साऊंड शो याचे सविस्तर वर्णन करायचे म्हणजे एखादी कादंबरी झाली असती.पण शब्द मर्यादा लक्षात घेता खालील प्रमाणे वाचकासाठी थोडक्यात माहिती देत आहे.
काळे पाणी म्हटले की सर्वांचा असा ग्रह होतो की, अंदमानचे पाणी अस्वच्छ असेल. पण हा शब्द काल या संस्कृत शब्दाशी निगडित आहे. या ठिकाणी शिक्षा झालेल्या क्रांतिकारकांची परत येण्याची शक्यता अतिशय धूसर असल्यामुळे त्यांचा काळ आला यावरून नाव ठेवले काल्.त्यानंतर काल चे काळे असे अपभ्रंश झाल्यामुळे काळे पाणी हे नाव प्रचलित झाले.अंदमान जेलच्या निर्मितीचा इतिहास मोठा क्लेशकारक आहे. इथे दिलेल्या क्रूर वागणुकीमुळे हा जेल सबंध जगात सर्वात धोकादायक म्हणून प्रसिद्ध आहे.१८९६ ते १९०६ या कालखंडामध्ये काळ्या पाण्याच्या कैदेवर आणलेल्या बंदीवानां कडूनच तो बांधून पूर्ण केला. सुरुवातीला या जेलचे एकूण सात विंग होते. पण त्यापैकी चार भाग हे भूकंपात नष्ट झाले.आता फक्त तीन विंग शिल्लक आहेत .प्रत्येक विंगवर एकूण तीन मजले आहेत. मध्यभागी एकच निरीक्षण टॉवर आहे.एकूण ६९८ एकांत कोठड्या आहेत. कोणत्याही एका कैद्याला दुसऱ्या कैद्याची संपर्क साधता येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळेच ” सेल्युलर जेल”, हे नाव दिले गेले. प्रत्येक कोठडी १३ फूट लांब ७ फूट रुंद व १० फूट उंच आहे. कोठडीचा दरवाजा आतून ऊघडणे किंवा कुलूप तोडणे शक्यच नव्हते. हवेसाठी फक्त एक छोटीशी खिडकी आहे. कोठडी समोर,चार फूट रुंदीचा व्हरांडा आहे.
बेटावर मिळणाऱ्या अगणित नारळां पासून तेल कोलूच्या घाण्यातून बंदीवाना मार्फत काढले जाई.संध्याकाळी पाच ते सकाळी सहा पर्यंत कैद्यांना एक छोटे मातीचे भांडे दिले जाई. ते फक्त एक वेळच्या मलमूत्र विसर्जनासाठी उपयोगात येत असे. त्यामुळे ही काल कोठडी म्हणजे दुर्गंधीचे साम्राज्य होते. रात्री शौचास परवानगी नसे. बेरी हा प्रमुख जेलर अतिशय क्रूर व दयेचा लवलेशही नसलेला अधिकारी होता. तो कैद्यांना म्हणे, “या जगात दोन देव आहेत. एक या पृथ्वीवर व दुसरा नरकात. त्यामुळे मी पृथ्वीवरील देव जे तुम्हाला सांगेन तेच करावे लागेल. तुम्ही करा अथवा मरा!” त्याच्या मनात जे येईल तसे तो करी. प्रत्येक कैद्याला घाण्यावर दिवसभरात पंधरा किलो तेल काढावे लागे. यासाठी कैद्यांना बैलाप्रमाणे घाण्याला जुंपले जाई. तेवढे तेल काढले नाही तर, खांबाला बांधून चाबकाने फोडले जाई. क्रांतिकारकांच्या गळ्यापासून पायापर्यंत साखळदंड बांधले जात. त्यामुळे त्यांना नरकयातना म्हणजे काय, याचा अनुभव जेलमध्येच येत असे.
बंदीवानांनी रोजचे दिलेले कोलूचे काम थोडे जरी अपूर्ण ठेवले तर उघड्या अंगावर आसुडाचे फटके मारून शिक्षा दिली जाई.तुरुंगातील जेवण अतिशय घाणेरडे असे. जळक्या रोट्या, आमटीत पाणी, पाण्यावर तरंगणारे किडे. ते जेवण देखील अल्प दिले जात असे. पाणीही अतिशय कमी मिळत असे . कोठडीच संडास व लघवी करावी लागायची. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम सर्वांसमक्ष होई. एकाच वेळी तीन कैद्यांना फाशी देण्यात यायची. फाशी दिल्यानंतर प्रेत वीस फूट खोल खड्ड्यात टाकले जायचे. तेथून ते समुद्रात फेकून दिल्यानंतर माशांनी खाल्ल्या मुळे प्रेताचा थांग पत्ता लागायचा नाही. फाशी दिली जात असताना क्रांतिकारकांनी वंदे मातरम आणि इन्कलाब जिंदाबादच्या दिलेल्या घोषणा लाईट अँड साऊंड शो मधून पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले होते.
तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या कोठडीला दोन दरवाजे होते. ते त्यांच्यावर मेहरबानी म्हणून नव्हे तर अत्यंत धोकादायक असे वाटत असल्यामुळे खास पाळत ठेवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. सावरकरांविषयी अपशब्द उच्चारणाऱ्या नेत्यांनी जर सेल्युलर जेल बघितले तर त्यांच्या लक्षात येईल की, स्वातंत्र्यवीरांना नाउमेद व नामशेष करण्यासाठी ब्रिटिशांनी योजलेल्या अनेक क्लृप्त्या, अघोरी शिक्षांचे प्रकार पाहिल्या नंतर सावरकरांच्या त्यागाचे महत्त्व कळल्याशिवाय राहणार नाही. याच सेल्युलर जेलमध्ये आपल्या आयुष्याची अकरा वर्षे त्यांनी व्यतीत केलेली आहेत. त्यांच्या देशसेवेला सीमा नाही. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगीत आहोत ते केवळ आणि केवळ या राष्ट्रवीरांच्या आत्मसमर्पणामुळेच होय. या वीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोठडीला भेट दिली असता चपला काढून त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झालो. त्यांनी वापरलेले कपडे, घोंगडी, ताट वाटी ला वंदन केले. स्वातंत्र्यवीरांनी आमच्यावर केलेल्या उपकारा प्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना मनात आपोआप निर्माण झाली. याच कोठडीच्या भिंतीवर कमला हे काव्य लिहून तोंड पाठ केले होते. त्यामुळे ने मजशी मातृभूमीला… सागरा प्राण तळमळला… हे अजरामर गीत आठवले. या जेलमध्ये तेलाचा घाणा, फाशीचे दोर, क्रांतिकारकांना मारण्यात येणारा आसूड, त्यांनी वापरलेल्या वस्तू आता सुद्धा जतन करून ठेवलेल्या आहेत.भारतातील प्रत्येक नागरिकाने आयुष्यात एकदा तरी सेल्युलर जेलला भेट दिली पाहिजे म्हणजे आपोआपच त्याच्या राष्ट्र प्रेमात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. (क्रमशः)