अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. – संपादक
हॅवलॉक आयलँड बीच रिसॉर्टवर पहाटेच जाग आली ती निरनिराळ्या पक्षांच्या आवाजाने. रूमच्या बाहेर येऊन पाहिले तर आमच्या रिसॉर्टच्या कंपाउंड पर्यंत समुद्राचे पाणी आलेले होते.शांत वातावरणात समुद्राचे निरीक्षण करणे खूपच आल्हाददायक वाटत होते.अर्धा तास मॉर्निंग वॉक केला. त्यानंतर रिसॉर्ट मध्ये असलेल्या स्विमिंग पूल वर मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटला.काल रिसॉर्ट मध्ये आल्यानंतर जे गोड नारळ पाणी आम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून दिले होते त्याची आठवण झाली. वेटरला सांगून दोन नारळ पाणी पिले. सकाळी साडेआठ वाजता सर्वजण आपापल्या बॅगा घेऊन पुढील प्रवासासाठी तयार झाले होते. अमेरिकन ब्रेकफास्ट घेऊन आम्ही धक्क्यावर पोहोचलो. पुन्हा एकदा सर्व सोपस्कार पूर्ण करून क्रूज मधून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. ही क्रूज डायरेक्ट श्री विजयपूरम ला न जाता शहीद द्वीप मार्गे जाणार असल्यामुळे दोन तासापेक्षा जास्त वेळ समुद्र सफारीला लागला.
साडेबाराच्या सुमारास आम्ही श्री विजयपूरम ला पोहोचलो. आमचे सामान हॉटेल ला पोंहचविण्यासाठी छोट्या हत्तीची व्यवस्था करण्यात आली होती. आम्ही मात्र हॉटेलला जाण्यापूर्वी संग्रहालय पाहण्याचा निर्णय घेतला.पोर्ट ब्लेअरला अनेक संग्रहालये आहेत.यामधून समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडत असल्यामुळे प्रत्येकाने भेट देणे आवश्यक आहे. ही संग्रहालये कलाकृती आणि कथांचे अमूल्य भांडार म्हणून काम करतात. बेटाच्या भूतकाळावर आणि स्थानिक परंपरांवर प्रकाश टाकतात. या प्रदेशातील समृद्ध सांस्कृतिकची सखोल माहिती देतात.या सर्वोत्कृष्ट संग्रहालयातून परस्परसंवादी प्रदर्शन आणि क्युरेट डिस्प्लेचा अभिमान दिसून येतो.ज्यामुळे या प्रदेशातील समृद्ध टेपेस्ट्रीबद्दल अभ्यागतांच्या ज्ञानात वाढ होते.
समुद्रिका या नौदल सागरी संग्रहालया आम्ही एकच्या दरम्यान पोहोचलो.आज रविवार असल्यामुळे बरीच गर्दी होती.सेल्युलर जेलच्या जवळच समुद्रिका नेव्हल मरीन आहे. भारतीय नौदलाद्वारे संचालित या अंदमान हॉटस्पॉटला मत्स्यसंग्रहालय देखील म्हटले जाते. इथे विविध प्रकारच्या प्रदर्शनांसाठी पाच खोल्या तयार केलेल्या आहेत.ज्यात वनस्पती, प्राणी, स्थानिक समुदायांची जीवनशैली आणि बेटांच्या सागरी परिसंस्थेबद्दल आकर्षक माहिती दिलेली आहे.इथे कलाकृतींचा विस्तृत संग्रह आहे.ज्यापैकी काही अत्यंत दुर्मिळ आहेत,जसे की शेल, माशांचे नमुने आणि कोरल. संग्रहालयाच्या लॉनवर निकोबार बेटावर मिळविलेल्या निळ्या व्हेलचा प्रचंड सांगाडा सर्वांनी कुतूहलाने पाहिले.हे संग्रहालय दररोज सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत खुले असते. सोमवारी संग्रहालयाला आठवडी सुट्टी असते. प्रौढांसाठी ₹ ५० तर विद्यार्थ्यांसाठी ₹ २५ प्रवेश शुल्क आहे. हे संग्रहालय पाहण्यासाठी एक तासाचा वेळ लागतो.
त्यानंतर आम्ही कार्बन कोव बीचवर असलेल्या पियरलेस रिसॉर्टवर पोहोचलो. विस्तीर्ण जागेत असलेले हे हॉटेल अनेक वर्षापासून पर्यटकांच्या सेवेत कार्यरत आहे. इमारत जुनी असली तरी सुस्थितीत आहे.आमच्यासाठी दुपारचे जेवण तयार असल्यामुळे सर्वांनी चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. रूममध्ये एक तास विश्रांती घेतली. आता आम्हाला जायचे होते मानववंशशास्त्रीय संग्रहालय पाहण्यासाठी. पोर्ट ब्लेअर अर्थात श्री विजयपूरम मधील सर्वोत्कृष्ट संग्रहालयांपैकी एक असलेले हे संग्रहालय. इथे आलेल्या प्रत्येक अभ्यागतांनी ते पाहणे चुकवू नये. हे पहात असताना अंदमान आणि निकोबार बेटांच्या मूळ लोकांबद्दलची जीवनशैली तसेच त्यांची संस्कृती पाहण्यास मिळाली. या एथनोग्राफिक संग्रहालयात निकोबार बेटावरील मंगोलॉइड,सेंटिनेलीज, जरावा, ओंगेस या आदिवासींच्या अंदमानी महान संस्कृतीचे दर्शन झाले. शॉम्पेनससह अंदमान बेटावरील चार नेग्रिटो लोकांची सविस्तर माहिती मिळाली. इथे दृकश्राव्य साठी असलेल्या विशेष खोलीत पंधरा मिनिटाच्या चित्रफितीतून मूळ जमातींची विशिष्ट संस्कृती, जीवनशैली आणि रीतिरिवाजांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे.
हे मानववंशशास्त्रीय संग्रहालय १९७५ या वर्षी सुरू करण्यात आलेले होते. सध्या दोन मजली इमारती मध्ये आदिवासी वापरत असलेल्या विविध वस्तू, हत्यारे पाहताना आदिमकाळात जाऊन आल्यासारखे वाटले. आदिवासींचे नृत्य, धार्मिक श्रद्धा, संगीत आणि कला याची विस्तृत माहिती मिळाली. अंदमान आणि निकोबार बेटावरील जीवनपद्धतीबद्दल अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या इतिहासप्रेमींसाठी एक लायब्ररी देखील इथे आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी वीस रुपयाचे नाममात्र शुल्क आकारण्यात येते. रिसॉर्टवर परत येताना काहींनी मार्केट मधून खरेदी केली. रात्रीच्या जेवणापूर्वी विद्या नोमूलवार यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. संदीप मैंद यांनी सर्वांना सूचना केली की, बारातांग पाहायला जाण्यासाठी रात्री तीन वाजता तयार राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सक्तीने सर्वजण लवकरच झोपी गेले. (क्रमशः)