अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. – संपादक
सकाळी नाश्त्याचे पार्सल सोबत घेऊन आम्ही ईस्टर्न गेट हॉटेल सोडले. एसी टेम्पो ट्रॅव्हल्स ने पंधरा मिनिटात जेटी वर पोहोचलो. आजचा आमचा प्रवास क्रुझने होणार होता. विमानतळाप्रमाणे या ठिकाणी सर्व तपासणी होते. मॅक्रो क्रूज मध्ये आमच्या सीट रिझर्व केलेल्या होत्या. क्रूझ चा अनुभव बहुतेक जण पहिल्यांदाच घेत होते. प्रशस्त अशा क्रुझ वर एसीमध्ये तीनशेच्या आसपास आरामदायी सीटवर बसण्याची व्यवस्था केलेली होती.अथांग समुद्रात प्रवास करताना अतिशय उत्साही वातावरण निर्माण झाले होते. सेल्फी,ग्रुप फोटोला उधाण आले होते. दीड तासाचा प्रवास करून आम्ही हॅवलॉक बेटावर पोहोचलो. गुलामगिरीची प्रतीके हटवण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने अंदमान निकोबार बेटावरील अनेक बेटांचे नामकरण नव्याने केले असल्यामुळे हॅवलॉक बेटा ला स्वराज द्वीप असे ओळखले जाते.
स्वराज दीप ला उतरल्यानंतर आमचे सामान डायरेक्ट हॉटेलला पोहोचण्याची व्यवस्था केली होती. आम्ही मात्र एक जोडी कपडे घेऊन एसी टेम्पो ट्रॅव्हल्स ने सात किलोमीटर अंतरावर असलेल्या राधानगर बीच कडे निघालो.हॅवलॉक बेट आणि संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हणजे राधानगर बीच. ज्याला बीच क्रमांक ७ म्हणूनही संबोधले जाते, २००४ मध्ये टाइम मॅगझिनने आशियातील सर्वात मोठा समुद्रकिनारा आणि जगातील सातवा सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून निवडले होते.
२०१६ मध्ये ट्रिप ॲडव्हायझर्स ट्रॅव्हलर्स चॉईस अवॉर्ड्सद्वारे देखील या बीचची यादी टॉप २५ पैकी एक म्हणून करण्यात आलेली आहे. समुद्रकिनाऱ्यावर उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून तयार केलेल्या असंख्य झोपड्या, बेंच आणि खुर्च्या वर आमचे सामान ठेवले. हा संपूर्ण परिसर उंच झाडांनी नटलेला असल्यामुळे आराम करण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे.नीलमणी निळे पाणी आणि वाळूचे पांढरे दाणे असलेले विशाल किनारे दोन किलोमीटर पसरलेले होते. ते पाहताना अंदमान आणि निकोबार बेटांचे राधानगर बीचला प्रमुख आकर्षण का म्हटले जाते याची प्रचिती येते.हे बीच शांतता आणि सौंदर्यासाठी एक हॉप, स्किप आणि जंप असल्याने ते विदेशी पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे.समुद्राचे निळे पाणी शांत आणि आमंत्रण देणारे होते.
बचावासाठी सज्ज असलेल्या गस्त घालणाऱ्या जीवरक्षकांसह समुद्रकिनाराही सुरक्षित वाटत होता. वनविभागाच्या काळजीपूर्वक देखरेखीमुळे आणि प्रदेशात वारंवार मगरीचे दर्शन न झाल्यामुळे समुद्रकिनारा केवळ सुंदरच नाही तर पोहण्यासाठीही सुरक्षित आहे.पाण्यात कोणतेही कोरल किंवा खडक नव्हते.त्यामुळे ज्यांनी पाण्यात न उतरता किनाऱ्यावर बसून रहायचे असा विचार केलेला होता. तो बदलून पाण्यात डुबक्या मारल्या.इथे लाटा मध्यम आकाराच्या आहेत. याव्यतिरिक्त समुद्राची खोली पुरेशी आहे.ज्यामुळे बिंदासपणे सर्वजण पाण्यात खेळत होते. काहीजण पोहण्याचा आनंद लुटत होते. मला नाही वाटत की, समुद्र स्नानाचा आनंद घेण्यासाठी राधानगर इतके सुंदर बीच दुसरे कोणते नसेल.
समुद्रकिनाऱ्याजवळ असलेले जीव रक्षक डोळ्यात तेल घालून पाहणी करत होते. कोणी दहा मीटर च्या आत पोहण्यासाठी गेले तर लगेच शिट्टी वाजवून धोक्याची सूचना देत होते. १० मीटरच्या पलीकडे पाण्याचे प्रवाह आणि लाटा किंचित खवळतात त्यामुळे ही दक्षता घेणे आवश्यकच आहे. मनसोक्त पोहून व लाटांवर उड्या मारल्यानंतर आम्ही समुद्राच्या बाहेर आलो. या बेटाला लागूनच एलिफंट समुद्रकिनारा आहे.तिथे माहूत पर्यटकांना जॉयराईडसाठी हत्ती वर घेऊन जातात. जर तुम्ही जगातील कोणत्याही समुद्रकिना-यावर हत्तीची सफर अनुभवली नसेल, तर तुम्ही नक्कीच हा प्रयोग इथे करून पहा. राधानगर बीच सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
दुपारी एक वाजता आम्ही पोहोचलो हॅव लॉक आयलँड बीच या रिसॉर्टवर. आमच्या मुक्कामाची येथील व्यवस्था पाहून सर्व जण चकितच झाले.लाकडी झोपडी-शैलीचे रेस्टॉरंट आहे. समुद्र किनाऱ्यावर दोन एकर पेक्षा जास्त जागेत हे बांधलेले आहे. स्वतंत्र प्रशस्त रूम मध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. अतिशय उत्तम पद्धतीच्या दुपारचच्या जेवणाचा आस्वाद सर्वांनी घेतला. या ठिकाणी सीफूड आणि शाकाहारी पदार्थ थोडे तेलकट असले तरी दर्जेदार व चविष्ट होते.
संध्याकाळी चारच्या सुमारास आम्ही काला पत्थर या बीच ला भेट दिली.एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसरीकडे हिरवेगार पर्जन्यवन अशा विस्मयाच्या जगात पूर्णपणे हरवून गेलो .समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने नयनरम्य वातावरणात तीन किलोमीटर चाललो. निसर्गाच्या वैभवात चिरस्थायी आठवणींना उजाळा देण्याची ही अद्भुत संधी या सी वॉक मुळे मिळाली. चहा पिण्यासाठी एका टपरीवजा हॉटेलवर आम्ही थांबलो होतो. चहावाला चहा बनवताना गुणगुणत होता. त्याचा आवाज ऐकून संदीप मैंद यांनी आपल्या जवळचा कोराओके आणून दिला. अतिशय जबरदस्त आवाजात गणेश ने कुमार सानू ची एक दोन गाणे म्हटली. ती ऐकून मी बीचवर सर्वांना एकत्रित करून सांगितले की, अंदमान बेटावरील ज्युनिअर कुमार सानू हा आपल्यासाठी गाणे गाणार आहे. आमची मैफिल सुरू झाली आणि बघता बघता इतर पर्यटक देखील आमच्या सोबत सामील झाले. काहींनी अतिशय सुंदर डान्स या ठिकाणी केला. वेळेअभावी ही मैफिल अधुरी सोडावी लागली.
संध्याकाळी रिसॉर्टवर पोहोचल्यानंतर वातावरण एकदम अद्भुत होते. उंच उंच नारळाच्या झाडांना लावलेली रंगीबेरंगी लाइटिंग मनमोहक होती. दिलच्या आकारात सजवलेल्या बेंचवर अनेकांनी कपल फोटो काढले. या ठिकाणी स्विमिंग पूल ची व्यवस्था असल्यामुळे काहींनी पोहण्याचा आपला शौक पूर्ण केला.
समुद्रकिनारावर असलेल्या झोपाळ्यावर बसून समुद्राचे शांत रूप पाहण्याचा आनंद आम्ही लुटला. रात्री सात वाजता अद्यावत डीजे वाजणे सुरू झाले. मग काय सर्वांचे पाय तिकडे वळले. वय विसरून सर्वजण मनसोक्त नाचले. ढोल बाजे ढोली ना या गरबा गाण्यापासून सुरू झालेली ही डान्स ची मैफिल अभी तो पार्टी शुरू हुई है या युगल गीतापर्यंत कधी पोहोचली हे समजले देखील नाही. दिवसभर पोहणे व डान्सचा भरपूर आनंद घेतल्यामुळे चविष्ट भोजनानंतर प्रशस्त बेडवर पडल्यानंतर निद्रा देवीच्या कुशीत लगेच विसावलो. (क्रमशः)