आत्मीय स्वागत आणि यात्रेच्या महोत्सवाची झलक!”
वंदे भारतने आम्हा सर्वांना सकाळी ११ वाजताच्या सुमारास श्रीनगर स्टेशनवर उतरवले. गाडी थांबताच सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान फुलले… ‘१०० टक्के उपस्थिती. मनोमन महादेवाचे स्मरण केलं, “हे तुझं आशीर्वादाचं बल आहे, म्हणून हा सोहळा शक्य होतो आहे.


शहरात मोठ्या वाहनांना नो-एंट्री असल्यामुळे १६ बुलेरो व टाटा सुमो आधीच बुक केल्या होत्या. स्थानिक ट्रॅव्हल्स एजंट सज्जाद भाई आमच्या स्वागताला स्वतः हजर होते. त्याच्याशी घट्ट मिठी झाली, केवळ ट्रॅव्हल्स एजंट नव्हे, तर यामधील एक आपुलकीचा दुवा. त्याने एका गाडीत ८ जण बसवण्याची सूचना केली, पण मी निर्णय घेतला, प्रत्येक गाडीत केवळ ६ जण! प्रवासी आणि सामान दोन्ही यथास्थित ठेवून आरामदायक प्रवासाचा निर्णय घेतला. आमच्या सर्वांनी आधीच “काश्मीर टूर”चा बिल्ला लावलेला होता, त्यामुळे श्रीनगरच्या ‘हॉटेल बुर्ज’ गाठताना कोणतीही अडचण आली नाही. कटरा येथे स्थायिक झालेले विजयकुमार सिनकर, यांच्याकडे हॉटेल बुकिंगची जबाबदारी होती, ती त्यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडल्यामुळे त्यांचा आणि हॉटेल मालकाचा सत्कार ट्रॉफी देऊन केला.


शंकराचार्य मंदिर, उंचीवरचं आध्यात्मिक शांततेचं केंद्र
हॉटेलवर फ्रेश होऊन, आम्ही श्रीनगर दर्शनासाठी बाहेर पडलो, पुण्याचे शंकर मोरलवार, चव्हाण, आणि संभाजीनगरचे प्रकाश व प्रणिता कुलकर्णी हे आमच्यासोबत होते. प्रथम भेट दिली शंकराचार्य मंदिराला. आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेलं हे प्राचीन शिवमंदिर एका उंच टेकडीवर आहे. १०० पायऱ्या चढताच,काश्मीरचं विहंगम दृश्य नजरेत भरतं, जणू संपूर्ण श्रीनगर आपल्या पायाशी! हे मंदिर सतत कडक सुरक्षा व्यवस्थेच्या छायेखाली असते, कारण ते अतिरेक्यांच्या लक्ष्यावर आहे. इथूनच ‘छडी मुबारक’ पदयात्रा सुरू होते आणि अमरनाथ गुहेत पोहोचल्यावर तिचा अधिकृत समारोप होतो.


चश्मा शाही, शाही सौंदर्याचा झरा
१६३२ सालचा इतिहास असलेली ‘चश्मा शाही’ ही बाग म्हणजे सौंदर्याचा परमोच्च नमुना.मुघल सम्राट शाहजहानचा गव्हर्नर अली मर्दान खान यांनी ही बाग प्रिन्स दारा शिकोहसाठी भेट म्हणून बांधली होती.
झबरवान पर्वतरांगेच्या कुशीत वसलेली ही बाग, राजभवनाच्या शेजारी, दल सरोवराच्या दिशेने खुली आहे. बागेची रचना पर्शियन शैलीवर आधारित असून ती तीन टेरेसेस मध्ये विभागली आहे.एका मधुर गोड्या पाण्याच्या झऱ्याभोवती संपूर्ण बाग रचलेली आहे.पहिल्या टेरेसवरून झरा सुरु होतो, दुसऱ्यावर धबधब्या सारखा वाहतो, आणि तिसऱ्या टेरेसवर एक सुंदर पंच-कारंजे तलाव उभा आहे.या झऱ्याच्या पाण्यात औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते.भारताचे माजी पंतप्रधान पं. नेहरू हे देखील या झऱ्याचे पाणी विमानाने दिल्लीला मागवत असत. आम्हीही सर्वांनी त्या पाण्याचा आस्वाद घेतला, जणू अमृतच प्यालो!

निशात गार्डन, निसर्गाच्या कुशीतलं सौंदर्याचं गान
‘निशात बाग’, आनंदाची बाग काश्मीरमधील दुसरी सर्वात मोठी मुघल बाग. शालीमार बागेनंतर सर्वाधिक प्रसिद्ध. दल सरोवराच्या किनारी आणि झबरवान पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर, ही बाग म्हणजे नयनरम्य काव्यच जणू.१६३३ साली नूरजहाँच्या भावाने, असफ खान याने या बागेची रचना केली.शाहजहान स्वतः तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध होऊन तिनदा आभार मानले, अशी आख्यायिका आहे.बागेच्या मध्यभागी एक जलवाहिनी, तर १२ टेरेस, ज्यात प्रत्येक टेरेस एका राशीचे प्रतिनिधित्व करते.गुलाब, लिली आणि इतर सुवासिक फुलांनी सजलेली ही बाग, प्रेमी युगुलांचे, पर्यटकांचे आणि निसर्गप्रेमींचे आवडते ठिकाण!
श्रीनगरची शांत रात्री आणि पुढील प्रवासाची तयारी
रात्री आठच्या सुमारास नांदेडच्या सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर नागेश शेट्टी यांच्यावतीने भोजनाची खास व्यवस्था होती. ज्यांना एकादशीचा उपवास होता, त्यांच्या साठी फळांचे पारंपरिक व उत्तम नियोजन केले होते.आमच्या उद्याच्या प्रवासासाठी सामानाचे दोन विभाग करणे, सुचना व नियोजन पूर्ण करून शेवटी… हॉटेल बुर्जच्या प्रशस्त रूममध्ये निद्रादेवीच्या साक्षीने आम्ही सर्व जण विसावलो. (क्रमशः)


