हिमायतनगर/हदगांव | हदगाव–हिमायतनगर तालुक्यात बांधकाम कामगार मंडळाच्या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, बोगस प्रमाणपत्रांना मंजुरी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा २७ जानेवारी २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


बांधकाम कामगार मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस बांधकाम काम केल्याचे ग्रामसेवक किंवा शासकीय कंत्राटदाराचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायत कार्यालयांचा बनावट शिक्का तयार करून काही एजंटांनी हा गैरव्यवहार धंद्याप्रमाणे सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खेड्यापाड्यातील गरजू नागरिकांकडून प्रत्येकी २ ते ३ हजार रुपये घेऊन बोगस प्रमाणपत्र तयार करून ते ऑनलाईन अपलोड करण्यात आले, असे निवेदनात नमूद आहे.

या प्रकरणात केवळ एजंटच नव्हे, तर बांधकाम कामगार मंडळातील काही अधिकारी व एजंट यांची मिलीभगत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कागदपत्रांची योग्य तपासणी व पडताळणी न करता मंजुरी देण्यात आल्याने शासनाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट झाल्याचे लहुजी शक्ती सेनेचे म्हणणे आहे.


या पार्श्वभूमीवर बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्या एजंटांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. कागदपत्रांना मंजुरी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. बोगस लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या लाभाची वसुली संबंधित अधिकारी व एजंटांकडून करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

या सर्व मागण्यांचे निवेदन लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुका अध्यक्ष राजू गायकवाड यांनी १६ जानेवारी २०२६ रोजी सहाय्यक आयुक्त (कामगार) कार्यालय व जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे सादर केले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील अनेक ग्रामसेवकांशी भ्रमणध्वनीद्वारे व प्रत्यक्ष संपर्क साधला असता, “आम्ही कोणत्याही व्यक्तीस बांधकाम कामगार योजनेसाठी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र दिलेले नाही. या बोगस प्रमाणपत्रांशी आमचा काहीही संबंध नाही,” असा स्पष्ट खुलासा संबंधित ग्रामसेवकांनी केला असून, आपली बाजू राजू गायकवाड यांच्याकडे मांडली आहे. या गंभीर प्रकरणामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

