श्रीक्षेत्र माहूरगड इलियास बावानी| महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज आनंद दत्त धाम आश्रम, माहूरगड येथे भेट देऊन राष्ट्रसंत गुरुवर्य साईनाथ महाराज यांचा यथोचित सत्कार केला. अलीकडेच शासनाच्या वतीने साईनाथ महाराज यांची महाराष्ट्रातील सर्व आयटीआय संस्थांचे मार्गदर्शक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल ही विशेष भेट घेण्यात आली.


आनंद दत्त धाम आश्रमाच्या वतीने अशोकराव चव्हाण साहेब यांचे स्वागत सिताराम पाटील, भाऊ पाटील, पुंडलिक सावकार, गोल्ला गोलेवार समाजाचे प्रदेशाध्यक्ष भुमन्नाजी आक्कमवाड व भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केले. कार्यक्रमास माहूर–किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. भिमरावजी केराम साहेब यांचीही उपस्थिती लाभली.



या प्रसंगी अशोकराव चव्हाण साहेब यांनी आश्रम परिसराची पाहणी करून अन्नछत्रातील सेवा कार्याचे आणि सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी साईनाथ महाराजांच्या राष्ट्रहिताच्या आणि समाजोपयोगी कार्याची प्रशंसा करताना, “जेव्हा जेव्हा आपण बोलावले, तेव्हा मी स्वतः उपस्थित राहून राष्ट्रसेवेत सहभागी होईन,” असा शब्द दिला.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रल्हाद देवडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन भुमन्नाजी आक्कमवाड यांनी मानले. आनंद दत्त धाम आश्रमातील कार्यकारी मंडळ आणि भक्तगणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.



