हिमायतनगर| हदगांव-हिमायतनगर तालुक्यात वन पर्यटनासह रोजगारांच्या संधीची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधितांकडे हिमायतनगरचे तहसीलदार यांच्यामार्फत निवेदनातून सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांनी केली असून दि.१८ ऑगस्ट रोजी सोनारीफाटा येथे आमरण उपोषणास बसण्याचा ईशारा दिला आहे.


सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) परिसरात असलेल्या वनजमिनीत जागृत देवस्थान श्री.हरहरेश्वर मंदिर,जागृत देवस्थान श्री.शंभो महादेव मंदिर, श्री. सुरजा देवी मंदिर,दावलमलीक दर्गा या मंदिर/दर्गा आहेत.त्यांना स्वतंत्रपणे तीर्थस्थळ, तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासह वाळकेवाडी-दुधड- सोनारी- पोटा बु. (ता.हिमायतनगर जि.नांदेड) येथिल वनजमिनींचे एकत्रित संपादन करुन वाळकेवाडी- दुधड- सोनारी- पोटा बु.येथे वनपर्यटनाचा दर्जा मिळण्यासाठी वनविभागाकडून नव्याने नियोजनबद्ध आराखडा तयार करुन मंदिर परिसराच्या त्याच बरोबर,या वनजमीनीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य योजना निसर्ग पर्यटन (२४०६ २२९५) अंतर्गत या वन/निसर्ग पर्यटनाचा तातडीने समावेश करुन घ्यावा.

शासन स्तरावरुन त्यासाठी तात्काळ निधी तरतुद व उपलब्धता करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार,वनमंत्री गणेश नाईक, पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे,खा.अशोकराव चव्हाण, खा.अजित गोपछडे,खा.नागेश पाटील आष्टीकर,आ.बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव, वनविभागाचे प्रधान सचिव, निसर्ग पर्यटन मंडळाचे संचालक,छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त,नांदेडचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, वनविभागाचे उपवनसंरक्षक तसेच,हिमायतनगरचे तहसीलदार,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी आदींना तहसीलदारांमार्फत निवेदनातून राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी,मराठी पञकार परिषद मुंबई संलग्न,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे मा.जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मारोतीराव भवरे कामारीकर यांनी पाठवलेल्या निवेदनातून केली असून या प्रकरणात येत्या दि.१८ ऑगस्टपासून श्री.हरहरेश्वर मंदिर पायथ्या शेजारील रस्त्यालगत,सोनारी फाटा येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचा ईशारा दिला आहे.


महत्वाचे म्हणजे,सदरच्या वनजमिनीतील दर्गा व मंदिरांना स्वतंत्रपणे तिर्थक्षेत्र व तीर्थस्थळांचा तसेच, सदरच्या वनजमिनीचे एकत्रित संपादन करुन वनपर्यटनाचा दर्जा मिळाल्यास हदगांव- हिमायतनगर तालुक्यात वनपर्यटन व रोजगाराला चालना मिळेल अशी मागणी जनतेतूनही जोर धरत असून भवरे यांनी याबाबत स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे लक्ष वेधल्याने त्यांच्या सामाजिक भावनेतून केलेल्या मागणीला जनतेसह सामाजिक,राजकीयस्तरावर चांगलेच पाठबळ मिळत आहे.


