श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी) माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीद बाबा दरगाह समोरील रस्त्यावर फेकून देण्यात आलेल्या रोपांबाबत वृत्त प्रसिद्ध होताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घाईगडबडीत रात्रीच ट्रॅक्टरमधून ती रोपे जंगलात नेण्याचा आटापिटा सुरू केला. यासाठी जेसीबीद्वारे जंगलातील उभी असलेली अनेक सागवानी झाडे तोडून नवीन रस्ता तयार करत रोपे फेकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडूभाऊ राठोड पालाईगुडाकर यांनी ही बाब स्वतः जंगलात पाहणी करून स्थानिक प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

लाखो रुपयांच्या निधीचा गैरवापर?


गेल्या चार वर्षांपासून वन विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी रोप लागवडीसाठी खर्च करण्यात आला असल्याचे दाखले दाखवले जात आहेत. शेतकऱ्यांची शेते भाड्याने घेऊन रोपवाटिका तयार केल्या; परंतु अनेकांना भाड्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. मजुरांच्या नावावर खड्डे खोदल्याचे दाखवले गेले मात्र प्रत्यक्षात जेसीबीने कामे केल्याचे तक्रारीत नमूद आहे.


अधिकाऱ्यांवर संरक्षणाचा आरोप
नागरिकांनी अनेकदा जिल्हा वन अधिकारी केशव वाबळे यांच्याकडे तसेच वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र चौकशीसंदर्भात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी माहूर वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी गेल्या चार ते पाच वर्षांपासून ‘अभय’ घेत ठाण मांडून बसल्याचा आरोप होत आहे.

“सखोल चौकशीची गरज”
पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंथूला आणि तहसीलदार अभिजीत जगताप यांनी तातडीने कारवाई करून गेल्या चार वर्षांचा कारभार तपासल्यास मोठे घबाड उघड होईल, असे मत सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ राठोड यांनी व्यक्त केले आहे.

