नांदेड| सोशल मिडीया, व्हॉटसअॅप, फेसबुक या माध्यमांचा कसा सकारात्मक वापर होऊ शकतो हे जगदंब हायस्कूल माहूरच्या १९८९ च्या माजी विद्यार्थ्यांनी दाखवून देत तब्बल ४६ वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांचा स्नेहमिलन सोहळा आनंददायी वातावरणात पार पडला.


माहूरच्या जगदंब हायस्कूल येथे १९७८-७९ या वर्षात शिकत असलेले माजी विद्यार्थी, सोशल मिडीया, व्हॉटसअॅप, फेसबुकच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यापासून एकमेकांना शोधत होते. या माध्यमांचा कसा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. याचे उदाहरण त्यांनी देत तब्बल ४६ वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र आले. प्रामुख्याने राजश्री फलटणकर यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, माजी विद्यार्थी प्रकाश जगत आणि संजय रामकृष्णराव कुलकर्णी यांनी निर्माण केलेली सकारात्मक उर्जा आणि सर्वांना एकत्र करण्याची नियोजन बध्दतता यामुळे तब्बल ४६ वर्षानंतर हे माजी विद्यार्थी एकत्र आले.


सुधीर देव यांचे उत्कृष्ट नियोजन तसेच किरण तळेगावकर आणि विजय भोपी यांच्या सहकार्याने हे स्नेहमिलन पार पडले. इतक्या वर्षानंतर हे सर्व मित्र एकत्र आल्याने सर्वांच्या चेहर्यावर आनंदाश्रू दिसून येत होते. शंकर राठोड, प्रदीप कान्नव, विजय कोरडकर, भारत बेहेरे, राजेंद्र देशमुख, जगदीश पांडे, सिमा देशमुख, मंगल देशपांडे, हिमांचल जोशी, लता कान्नव, सुनिता कान्नव, दया पांडे, बेबी तुंडलवार, लता कपाटे, विमल पवार आदी अनेक माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते. स्नेहमिलन सोहळात आनंद व्यक्त करताना अनेकांनी आपल्या जीवनाच्या खडतर प्रवासातील व यशस्वी भूमिकेची साचेबध्द मांडणी करुन आपले अनुभव कथन केले. तब्बल दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात त्यांनी माहूरच्या श्री रेणूका देवीचे, श्री दत्त मंदिराचे व परिसरातील धार्मिक स्थळांचे दर्शनही घेतले. जगदंब हायस्कूलचे सध्याचे मुख्याध्यापक जाधव यांनाही यावेळी पाचारण करुन या सर्व ४६ वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा सानंद सत्कार केला.


इतक्या वर्षानंतर आपण भेटत आहोत ही कदाचित ऐतिहासिक पर्वणी आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. माहूर गडावर जावून श्री रेणूका मातेचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानचे व्यवस्थापक चंद्रकांत भोपी यांनी या सर्वांचा सत्कार केला. ते देखील या सर्व प्रकारामुळे भावूक झाले होते. राजश्री फलटणकर यांनी दिलेले वेळोवेळी मार्गदर्शन व या माजी विद्यार्थ्यात निर्माण केलेली सकारात्मक उर्जा यामुळे हा ऐतिहासिक सोहळा पार पडल्याचे या सर्वांनी सांगितले. एकमेकांचा निरोप घेताना सर्वांच्याच डोळ्यात अश्रू दिसत होते. पुन्हा एकदा आपण सर्वजण भेटू असे म्हणत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.



