नांदेड | मध्यरात्रीनंतर अतिवृष्टीमुळे अनेक भागात पुराचे पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सर्वात आधी ज्येष्ठ समाजसेवक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व प्रसिद्ध उद्योजक सतीश सुगनचंदजी शर्मा यांच्यातर्फे शेकडो पूरग्रस्तांना जेवण वाटप करण्यात आले असून पूर ओसरेपर्यंत दानशूर नागरिकांच्या मदतीने लायन्सचा डबा वितरित करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक दिलीप ठाकूर यांनी दिली.


शुक्रवारी दुपारी बारा वाजल्यापासून जेवण वाटप करायला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्याशी दिलीप ठाकूर यांनी संपर्क साधून कोणकोणत्या भागात पुराचे पाणी शिरले याची माहिती घेतली. त्यानंतर दिलीप ठाकूर,सतीश सुगनचंदजी शर्मा,सुरेश शर्मा,शिवा लोट,प्रसाद देशपांडे, जनार्दन वाकोडीकर, पावडे मामा यांनी गुडघाभर पाण्यात उतरून प्रत्यक्ष पूरग्रस्तांच्या घरी जाऊन दुपारी चार वाजेपर्यंत गरमागरम जेवण पुरविले.


श्रावस्ती नगर व इतर सखल भागातील भागातील पूरग्रस्तांना लायन्सच्या डब्यामुळे दिलासा मिळाला. भाजपा नांदेड महानगर, लायन्स परिवार, अमरनाथ यात्री संघ यांच्यातर्फे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे, महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे व ॲड.किशोर देशमुख, लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल, पूर्व प्रांतपाल दिलीप मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.पूरग्रस्ताना अन्नदान करण्यासाठी इच्छुक दानशूर नागरिकांनी दिलीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



