हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात अतिवृष्टीसदृश्य अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. नुकतेच सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता काढणीला आलेल्या कापूस पिकावरही निसर्गाची अवकृपा कोसळली आहे. परतीच्या पावसामुळे पांढऱ्या सोन्याच्या वाती झाडावरच फाटून खराब होत असून, वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.


दिवाळीचा सण संपला तरी अधूनमधून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. एकूणच यंदाचा हंगाम शंभर टक्के नुकसानदायक ठरत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.परतीचा पाऊस थांबला असला तरी आभाळ दाटून येत असल्याने रब्बी पेरण्या रखडल्या आहेत. पाऊस सुरू असल्याने मशागतीची कामे ठप्प झाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.


शासनाने नुकत्याच मदतीच्या घोषणा केल्या असल्या तरी त्या बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. काहींना पहिल्या टप्प्यातील मदत अपुरी मिळाली तर दुसऱ्या टप्प्यातील सहाय्य अजून प्रतीक्षेत आहे. त्यातच रब्बी पेरणी व बियाण्यासाठी जाहीर झालेली मदतही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेली नाही. एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगते, मात्र प्रत्यक्षात मदत वेळेवर पोहोचत नसल्याने शेतकरी अजूनही संकटातून बाहेर पडू शकलेला नाही. अनेक शेतकरी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत असून, “हंगाम गेला, पिकं गेली — पण मदत अद्याप वाटेत आहे,” अशा शब्दांत शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त होत आहेत.


हमी भावाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव
शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचे आश्वासन देत शासनाने हमीभाव जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात बाजारात शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे. मागील काही दिवसांपासून बाजारात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, ज्वारी आणि तूर या पिकांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मालाची किंमत हमीभावापेक्षा ४० ते ५० टक्के कमी दराने केली जात आहे. त्यामुळे मेहनतीने पिकवलेला माल विकताना शेतकऱ्यांना तोट्याचा व्यापार करावा लागत आहे. शासनाने हमीभावाचा गाजावाजा केला, परंतु प्रत्यक्षात खरेदी केंद्रे वेळेवर सुरु होत नाहीत, तर सुरु असलेली केंद्रेही अपुर्या साठवण व्यवस्था, तोल काटे आणि मजूर टंचाईमुळे ठप्प स्थितीत आहेत.

“शासन हमीभाव देतो पण व्यापारी आणि मध्यस्थ यांच्याकडून शोषण होते. आम्हाला दर वर्षी हेच संकट भोगावे लागते. मेहनत आपली आणि फायदा दलालांचा,” असे एका शेतकऱ्याने सांगितले. शेतकऱ्यांच्या घामाने ओथंबलेल्या शेतात पिकवलेला माल हमीभावाशिवाय विकावा लागतोय, हे शासनासाठी चिंतेचे आणि लाजिरवाणे वास्तव ठरत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने खरेदी केंद्रे सुरु करावीत, शेतमालाचा हमीभावाने थेट खरेदीचा आदेश द्यावा, कवडीमोल दारात माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्यासाठी अनुदान जाहीर करावे अशी मागणी केली जात आहे.


