नांदेड। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई न मिळाल्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा प्रशासनाकडे मांडल्या. भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ३ सप्टेंबरपर्यंत तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
वर्ष २०२३ च्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील ८ लाख १९ हजार ५९० शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी विमा काढला होता. गतवर्षीच्या जुलै व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी २ लाख ५० हजार २० दावे विमा कंपनीकडे दाखल केले होते. त्यापैकी १ लाख ९७ हजार २९९ दावे मान्य करून १५४.६७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती. तत्पूर्वी जुलैतील नुकसानानंतर उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होईल हे विचारात घेऊन अनुज्ञेय विमा दाव्याच्या २५ टक्के रक्कम आगाऊ देण्याच्या निर्णयानुसार २९६.३६ कोटी रुपयांची रक्कम मंजूर होऊन त्यापैकी २९२.५९ कोटी रुपयांचे वितरणही करण्यात आले होते.
दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा न मिळाल्याच्या किंवा कमी भरपाई मिळाल्याच्या तक्रारी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे केल्या होत्या. अलिकडेच झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या अनेक बैठकींमध्येही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती.
त्याअनुषंगाने खा. अशोकराव चव्हाण यांनी गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन या महत्वाच्या प्रश्नाबाबत विचारविनिमय केला. बैठकीअंती जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील १० दिवसांत म्हणजे ३ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या बैठकीला जिल्हा कृषि अधीक्षक भराटे यांच्यासह अनेक अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.