हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथील शेतकरी चंद्रभान दादाराव कदम (वय ६०) यांनी शेतातील विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) घडली. नातेवाईकांनी त्यांना तातडीने हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


मृत शेतकरी चंद्रभान कदम हे शेतीच्या कर्जामुळे आर्थिक अडचणीत होते. शासनाच्या अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी अनेकदा बँकेच्या फेऱ्या मारल्या, तसेच सेतू केंद्रावर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. मात्र अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने ते मानसिक तणावाखाली असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.


मृताच्या मुलगा निवृत्ती कदम यांनी रुग्णालयात दिलेल्या माहितीनुसार, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आणि आर्थिक विवंचनेतून नैराश्य आल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तथापि, आत्महत्येचे नेमके कारण अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.



या घटनेमुळे वारंगटाकळी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
मृत चंद्रभान कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी वारंगटाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस पाटलांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
टीप: कर्जमाफीत नाव नसल्यामुळेच आत्महत्या झाली, असा निष्कर्ष अधिकृतरीत्या समोर आलेला नसल्याने बातमीत तो दावा कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार मांडण्यात आला आहे.

