नांदेड,प्रतिनिधी| पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यूंप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील कथित अनियमितता आणि गैरव्यवहारांची चौकशी करावी, या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू)च्या वतीने नांदेडमध्ये तीव्र आंदोलन सुरू आहे.


या प्रकरणात २२ ते २४ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांनी केला असून, मोठ्या अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांना या प्रकरणासाठी जबाबदार धरून त्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.


नांदेडमधील अधिकाऱ्यांच्या कारभाराचीही चौकशीची मागणी
नांदेड जिल्ह्यातील विभागीय उपायुक्त बाबू हमीद तडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलेले ताडी दुकान बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पदाचा गैरवापर, कथित गैरव्यवहार आणि मर्जीतील व्यक्तींना महत्त्वाची व अतिरिक्त पदे देण्यात आल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. या सर्व प्रकरणांची विभागीय, खातेनिहाय तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या एकूण मालमत्तेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे, राज्याचे मुख्य सचिव, छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
‘मृत कामगारांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच’
विषारी दारूमुळे मृत्यू पावलेल्यांमध्ये बहुतांश कामगार आणि मागासवर्गीय समाजातील नागरिक असल्याचा दावा सीटूने केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि दोषी मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी घटना घडल्यापासून पाठपुरावा सुरू असल्याचे संघटनेने सांगितले.
१३ जुलैपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक कदम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील मागण्यांची दखल घेण्यात आल्याचे अधीक्षकांनी शिष्टमंडळाला सांगितल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
नवीन कौठा येथे उत्पादन शुल्क कार्यालयासमोर जोरदार निदर्शने
२१ जुलै रोजी दुपारी दोन वाजता नवीन कौठा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर सीटूच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध केला.
दरम्यान, माहूर तालुक्यातील मौजे वझरा शेख फरीद येथील पेसा ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. ग्रामसभेच्या ठरावानुसार गावातील शासनमान्य दारू दुकाने बंद करावीत, अशी मागणीही सीटूने केली आहे. या दारूबंदी आंदोलनाला संघटनेने पाठिंबा देत जिल्हास्तरावर पाठपुरावा करण्याची घोषणा केली आहे.
‘ठोस कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार’
पुणे व पिंपरी-चिंचवड येथील विषारी दारूमृत्यूतील मृतांना न्याय मिळेपर्यंत, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आणि नांदेड जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील कथित अनियमितता थांबेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण बेमुदत सुरूच राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाचे नेतृत्व सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉ. गंगाधर गायकवाड करीत असून कॉ. जयराज गायकवाड, कॉ. मंगेश वट्टेवाड, कॉ. अब्दुल वसीम, कॉ. मारोती केंद्रे, कॉ. पंढरी बरुडे, कॉ. सोनाजी कांबळे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले आहेत. सीटू राज्य कमिटी सदस्य कॉ. करवंदा गायकवाड आणि जमसं राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. लता गायकवाड यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

