श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे | साडेतीन शक्तीपीठ पैकी मूळ पीठ असलेल्या श्री रेणुका माता गडावर अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी म्हणजेच दि.३ ऑक्टोबर ते १२ या कालावधीत संपन्न होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नियोजनाची आढावा बैठक संस्थांचे अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या अध्यक्षतेखाली,तर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव मेघना कावली, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव , गटविकास अधिकारी सुरेश कांबळे,नं.पं.चे मुख्याधिकारी विवेक कांदे, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव ,बालाजी जगत, दुर्गादास भोपी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीत यात्रेशी निगडित तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख आणि केलेल्या कामाचा आढावा सादर केला. यावेळी संस्थांचे अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी शारदीय नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. या बैठकीत न.पं चे मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी यात्रा काळात सर्व सोयी सुविधायुक्त वाहनतळ, फिरते शौचालय, अस्थाई मुतारी, लाईट, आदी बाबींची पूर्तता करण्याची ग्वाही दिली.आगार प्रमुख यांनी गडावर जाणे येण्याकरिता सुस्थितीत अशा शंभर बसेसची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले, विद्युत वितरण कंपनीचे अभियंता यांनी गुंजवरून विद्युत पुरवठा खंडित न झाल्यास यात्रा काळात अखंड विद्युत पुरवठा करणार अशी वास्तव स्थिती मांडली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता भिसे यांनी आमच्या अतिरिक्त असलेल्या गडावर जाणाऱ्या रस्त्याची डागडुगी करून वाहतुकीस कुठलाही अडथळा येणार नाही, याबाबत दक्षता घेणार असल्याचे सांगितले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माचेवार यांनी औषधी साठा रुग्णवाहिका तसेच शहरातील दत्तचौक, रेणुका माता, दत्ता शिखर, अनुसया मंदिर आरोग्य सुविधा केंद्र व पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मान्य केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. किरण वाघमारे यांनी पन्नास बेड, आरोग्य पथक व रुग्णवाहिका सुसज्ज ठेवणार असल्याचे सांगितले.विशेषतः माहूर तिर्थक्षेत्र परिसरातील मंदिरे रामगड किल्ल्यावर असलेले महाकाली मंदिर, मातृतिर्थ तलाव यासह अंदाचे डझनावर संरक्षीत स्मारके पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून या सर्वच ठिकाणावर भाविकांची प्रचंड गर्दी होत असते, असे असताना पुरातत्व खात्याचे अधिकारी व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे या बैठकीकडे पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या बैठकीत व्हाईस तालुका अध्यक्ष विजय आमले, जेष्ठ पत्रकार वसंत कपाटे,राज ठाकुर, पुंडलिक पारटकर यांनी यात्रेच्या संबधाने प्रशासनाला आवश्यक सुचना केल्या, त्या सुचनांची पुर्तता करण्याची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व विभाग प्रमुखांना आदेशित केले.यावेळी संस्थानचे व्यवस्थाक योगेश साबळे,पत्रकार इंलीयास बावानी,राजु दराडे, दिगंबर जोशी, यांचेसह सर्व विभागांचे कर्मचार, नागरिक उपस्थित होते.या बैठकीचे प्रास्ताविक संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी केले तर चंद्रकांत भोपी यांनी सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार मानले.