हिंगोली| मा. न्यायालय व राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार वसमत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक तसेच हिंगोली नगर परिषदेच्या दोन प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया स्थगित करून नव्याने सुधारित वेळापत्रकानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.


वसमत नगर परिषद : संपूर्ण निवडणूक स्थगित – वसमत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी ३ तर सदस्य पदासाठी ७ उमेदवारांनी दाखल केलेल्या अपीलवर मा. न्यायालयाने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी निकाल दिला. या अपीलांवरील निर्णय उशिरा लागल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक कालावधी उमेदवारांना उपलब्ध झाला नाही. परिणामी संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया स्थगित करून सुधारित कार्यक्रम जारी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.


या सुधारित कार्यक्रमानुसार ४ डिसेंबर २०२५ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहिर होणार असून, १० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. आवश्यक असल्यास २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान घेण्यात येईल व २१ डिसेंबर २०२५ रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.


हिंगोली नगर परिषद – प्रभाग क्र. ५(ब) व ११(ब) ची निवडणूक नव्याने – हिंगोली नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक ५(ब) आणि ११(ब) या दोन जागांसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीची प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे. या प्रभागांवरील न्यायालयीन अपीलाचा निकाल २२ नोव्हेंबर २०२५ नंतर लागल्याने नियमित कार्यक्रमानुसार निवडणूक घेणे शक्य नव्हते.

कळमनुरी नगर परिषद – निवडणूक पूर्ववत – कळमनुरी नगर परिषदेबाबत कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्याने येथील निवडणुकीची प्रक्रिया पूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच पार पाडली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश – जिल्हा न्यायालयाकडून २३ नोव्हेंबर २०२५ नंतर निकाल लागलेल्या कोणत्याही नगरपरिषद अथवा नगरपंचायतीतील संबंधित सदस्य किंवा अध्यक्ष पदाच्या निवडणुका नियमानुसार स्थगित करण्यात येत आहेत. अशा सर्व जागांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी संकलित करून आयोगाला सादर करणे आवश्यक आहे.
परिशिष्ट–१ नुसार, मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायं. ५.३० अशी निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता तत्काळ लागू राहील. उपरोक्त क्षेत्रातील मतदारांवर प्रलोभनपर घोषणा, कार्यक्रम किंवा कृती कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. निवडणूक आयोगाने नियमानुसार व्यापक प्रसार करावा तसेच सर्व नवीन निर्देशांचे पालन करावे, असे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयुक्तांच्या निर्देशानुसार सुधारित निवडणूक कार्यक्रमाचे पालन करण्याचे आवाहन सचिव सुरेश काकाणी यांनी केले आहे.


