नांदेड| यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे व खते घेण्यासाठी ३ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी १० हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदतीचे वितरण सुरु झाल्याची माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे.


सोशल मीडियावरून ही माहिती देताना त्यांनी सांगितले की, रब्बी हंगामासाठी मदत म्हणून नांदेड जिल्ह्याला ७२७.९३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. ही मदत कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदाच्या खरीप हंगामात भाजप महायुती सरकारने एकूण १४०४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पिकांच्या नुकसानीपोटी सप्टेंबरमध्ये नांदेड जिल्ह्याला ५५३.४९ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्या निधीपैकी सुमारे ८५ टक्के निधीचे वितरण यापूर्वीच पूर्ण झाले आहे, अशीही माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे.



