किनवट, परमेश्वर पेशवे। रविवारी (ता .२७) रात्री सारखणी बीटातील वडोलीच्या जंगलातील हनुमान मंदिरापासून ३०० मीटर अंतरावर बिबट्या सुन्न अवस्थेत पडल्याचे ग्रामस्थांना दिसला ग्रामस्थांनी बिबट्याच्या अतिशय जवळ जावून मोबाईलद्वारे चित्रीकरण करून वनविभागाला कळवले.
परंतु, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर न पोहचल्यामुळे घटनास्थळी बिबट्या नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गाढ झोपेत असलेला वन विभाग खडबडून जागे झाला व बिबट्याचा शोध सुरु केला, तीन दिवसापासून जंगलात ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याचा शोधाशोध सुरू आहे. परंतु, त्यांना बिबट्याचा आणखी कुठलाही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे बिबट्या गेला कुणीकडे? शोधू कुठे? म्हणण्याची वेळ वन विभागावर आली आहे.
वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दीला नाही. त्यामुळे सहाय्यक वनसंरक्षक गणेश गिरी यांच्याशी संपर्क केला. त्यांनी बिबट्या घटनास्थळावरून पळून गेल्याचा अंदाज व्यक्त केला. खरंच मृत बिबट्याला पाय फुटली की काय ? म्हणण्याची पाळी आता वन विभागात आली.आणि वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावून त्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. खरेच हा बिबट्या मृतअवस्थेत होता का जिवंत होता याचा शोध लागणे सुद्धा आता वन विभागाला अवघड बनले आहे.
बिबट्याच्या मृत शवाची चोरी झाल्याचा ग्रामस्थांचा संशय? खरेच बिबट्या मृत होता का जिवंत होता हा एक संशोधनाचा विषय आता वनविभागासाठी बनला आहे. भरधाव वाहनाने बिबट्याला धडक दिल्यामुळे त्याच्या अंगातून मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाला आणि त्याचे शरीर सुन्न पडले होते. अशा परिस्थितीत बिबट्या पळून कसा जाऊ शकतो? वन विभागाचे कर्मचारी अधिकारी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी न आल्यामुळे अज्ञात इसमाकडून बिबट्याच्या मृत शवाची चोरी झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.